तीन खासगी रुग्णालयात ऑक्सिजनअभावी रुग्णांना नो एन्ट्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:40 AM2021-04-16T04:40:52+5:302021-04-16T04:40:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे महापालिकेच्या कोविड सेंटरबरोबरच शहरातील खासगी कोविड, नॉन कोविड रुग्णालयांनादेखील ऑक्सिजनसाठी धावपळ करावी लागत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे महापालिकेच्या कोविड सेंटरबरोबरच शहरातील खासगी कोविड, नॉन कोविड रुग्णालयांनादेखील ऑक्सिजनसाठी धावपळ करावी लागत असल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता शहरातील तीन खासगी कोविड रुग्णालयांनी ऑक्सिजनचा साठा संपल्याने नव्या रुग्णांना घेणे बंद केले आहे. शहरात दोन मंत्री असूनही ठामपा प्रशासनाची ऑक्सिजन पुरवतांना दमछाक होत आहे.
विशेष म्हणजे सध्या येथे उपचारासाठी दाखल असलेल्या ऑक्सिजनवरील रुग्णांसाठी आता देवाकडेच प्रार्थना करा, अशी विनंती त्यांनी सोशल मीडियावर एका मेसेजद्वारे केली आहे. त्यातही आता इतर खासगी रुग्णालयांची हिच अवस्था असून त्यांनीही महापालिकेकडे ऑक्सिजनसाठी धावा सुरू केला आहे. परंतु, पालिकेच्याच पार्किंग प्लाझा कोविड सेंटरला अद्याप ऑक्सिजन मिळालेला नाही. तसेच जे आहे ते ग्लोबलमधील रुग्णांसाठीदेखील अपुरे असल्याने खासगी रुग्णालयांना कसा पुरवठा करायचा असा पेच महापालिकेपुढे उभा राहिला आहे
ठाणे शहरात कोरोनाचे एक लाख ३०६ रुग्ण झाले आहेत. तर आतापर्यंत ८२ हजार १४७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून एक हजार ५२५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्याच्या घडीला १६ हजार ६९५ रुग्णांवर प्रत्यक्ष उपचार सुरू आहेत. या रुग्णांवर उपचारासाठी महापालिकेचे कोविड सेंटरदेखील आता अपुरे पडू लागले आहेत. अशातच पार्किंग प्लाझा कोविड सेंटरमध्ये अद्यापही ऑक्सिजनचा पुरवठा मिळालेला नाही. तर ग्लोबललादेखील एक दिवसापुरताही साठा नसल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. दुसरीकडे सध्या १२ हजार ६५२ रुग्ण हे घरीच विलगीकरणात आहेत. तर महापालिकेसह शहरातील विविध खासगी रुग्णालयात ऑक्सिजन, आयसीयू आणि व्हेंटिलेटरवर ६५३ रुग्ण असून त्यातील ६३ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. परंतु, या सर्वच रुग्णांना आता ऑक्सिजनची कमतरता भासू लागली आहे. दुसरीकडे खासगी कोविड रुग्णालयांनादेखील कुणी ऑक्सिजन देता का ऑक्सिजन अशी म्हणण्याची वेळ आली आहे. शहरात सध्या कोविड आणि नॉनकोविड असा ७५ रुग्णालयात कोविड आणि कोविड संशयित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. परंतु, काही दिवसांपासून या रुग्णालयांना ऑक्सिजन मिळविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. अखेर त्यांनी महापालिकेकडे पत्रव्यवहार करून ऑक्सिजनची मागणी केली आहे.
त्यात आता शहरातील तीन रुग्णालयांचा ऑक्सिजनचा साठा पुढील दोन ते तीन तास पुरेल एवढाच शिल्लक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता बेथनी रुग्णालयाने नवीन ॲडमिशन घेणेच बंद केल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. या रुग्णालयातील ८ रुग्णांना जवळजवळ १०० टक्के ऑक्सिजन लागत असून येथील आयसीयूचे सर्वच बेड फुल्ल असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. विशेष म्हणजे ठाण्यात सध्या बेथनी रुग्णालयाला अनेक रुग्णांची पहिली पसंती असल्याने ते आधीच फुल्ल झालेले आहे. त्यात आता ऑक्सिजनचा पुरवठा झाला नाही तर काय करायचे असा पेच रुग्णालय प्रशासनापुढे पडला आहे. दुसरीकडे हेल्थ केअर आणि प्रिस्टीएन या रुग्णांलयातही अगदी काही वेळ पुरेल एवढाच ऑक्सिजनचा साठा असल्याची आहे. त्यामुळे आता या रुग्णालयांनी येथे उपचारार्थ दाखल असलेल्या ऑक्सिजन आणि आयसीयूमधील रुग्णांसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट देवाकडेच प्रार्थना केल्याची माहिती समोर आली आहे.
............
शहरातील बहुतेक खासगी रुग्णालयांना ऑक्सिजनची गरज आहे. आम्ही महापालिकेकडे पत्रव्यवहार केला आहे. परंतु, त्यांच्याकडेदेखील पुरेसा साठा उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता रुग्णांना वाचविण्यासाठी आमची धडपड सुरू असून ऑक्सिजन उपलब्ध व्हावा यासाठी आम्ही शर्तीचे प्रयत्न करीत आहोत.
(डॉ. संतोष कदम - इंडियन मेडिकल असोसिएशन - अध्यक्ष, ठाणे )
......
महापालिकेच्या कोविड सेंटर बरोबरच खासगी कोविड सेंटरमध्येही ऑक्सिजनचा पुरवठा कमी आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यातूनही बेथनीला दोन मेट्रिक टन ऑक्सिजन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. परंतु, सर्वांचीच निकड भागविता येणे शक्य नाही. पार्किंग प्लाझा कोविड सेंटरला ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा यासाठी पत्रव्यवहार केला आहे. तसेच मुंब्य्रासाठीदेखील वेगळ्या प्रमाणात ऑक्सिजन मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
(गणेश देशमुख - अतिरिक्त आयुक्त, ठामपा)
.......
शहराला ११४ मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज
ठाणे शहराला रोज ११४ मेट्रिक टन ऑक्सिजनची सध्या गरज भासत आहे. परंतु, साठा मात्र उपलब्ध होतांना दिसत नाही. त्यात ठाणे महापालिकेच्या कोविड सेंटरला ४६ मेट्रिक टन रोजच्या रोज ऑक्सिजन लागत असून त्यातील रोज २० मेट्रिक टनचाच पुरवठा होत आहे. तर दुसरीकडे शहरातील खासगी रुग्णालयांना रोजच्या रोज ६८ मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज असून त्यातील ६० मेट्रिक टन कसाबसा उपलब्ध होत आहे. त्यात आता तासातासाला खासगी रुग्णालयातील ऑक्सिजनचा साठा संपुष्टात येत असल्याने या सर्वांची निकड कशी भागवायची असा पेच आता यंत्रणेपुढे निर्माण झाला आहे. त्यातही शहरात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड प्रतिनिधीत्व करतात. तरीही शहराचे प्रशासन ऑक्सिजनवर आल्याने संताप व्यक्त होत आहे.