सेलिब्रेटींसाठी क्रीडागृहात खेळाडूंना नो एण्ट्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 12:09 AM2019-02-02T00:09:22+5:302019-02-02T00:10:08+5:30
पालकमंत्र्यांसोबत तू तू मैं मैं; सोमवारी काढणार तोडगा; संतप्त पालकांचा सामन्यांदरम्यान गोंधळ
ठाणे : आधीच दादोजी कोंडदेव क्रीडागृहात केलेल्या बदलाविरोधात येथे सराव करण्यासाठी येणारे अॅथलेटिक्सपटू नाराज असताना शुक्रवारी सेलिब्रिटी क्रिकेट सामन्यांसाठी त्यांना मैदानात सरावास पालिकेने बंदी घातली. यामुळे संतप्त झालेल्या धावपटूंच्या पालकांनी सकाळी सेलिबे्रटी सामन्यांदरम्यान गोंधळ घालून क्रि केट सामन्यांसोबतच अॅथलेटिक्सना मैदानात खेळू देण्याची मागणी केली. यावरून पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकांमध्ये तू तू मैं मैं सुद्धा झाली. अखेर, पालकमंत्री आणि आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पालकांसोबत चर्चा करून यावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी बैठक आयोजित करण्याचे जाहीर केले.
महापालिकेच्या दादोजी कोंडदेव प्रेक्षागृहात नवीन खेळपट्टी तयार केली असून त्यानिमित्ताने शुक्रवारपासून येथे मराठी कलाकारांचे क्रिकेट सामने आयोजिले आहेत. त्यामुळे येथे सरावासाठी येणाऱ्या धावपटूंना सरावासाठी बंदी केली आहे. त्यानुसार, गुरुवारी सायंकाळी सरावासाठी गेलेल्या धावपटूंना प्रवेश नाकारून घरी पाठवले.
शुक्र वारी सकाळी सेलिबे्रटी सामन्यांच्या उद्घाटनासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आले होते. यावेळी धावपटूंना सरावास का बंदी घातली, याचा जाब विचारण्यासाठी ३० ते ४० पालक मैदानात आले. मैदानात यापूर्वी क्रि केटपटू आणि धावपटू असे दोघेही सराव करायचे. परंतु, आता अचानक धावपटूंना सरावास बंदी घालण्यामागचे कारण काय, असा सवाल पालकांनी केला. यामुळे पालकमंत्री एकनाथ शिंदे संतप्त झाल्याने त्यांची पालकांसोबत तू तू मैं मैं झाली. अखेर, नमते घेऊन शिंदे आणि आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पालकांसोबत चर्चा करून यासंदर्भात सोमवारी बैठक घेऊन तोडगा काढला जाईल, असे आश्वासन दिले. दादोजी कोंडदेव प्रेक्षागृहातील सिंथेटिक ट्रकचा काही भाग दुरुस्तीसाठी काढला आहे. त्यामुळे धावपटूंना मैदानाऐवजी पायºयांवर सराव करावा लागत आहे. यामुळे मुलांच्या गुडघ्याला आणि पायाला जखमा होत आहे. अशा परिस्थितीतही धावपटू राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक पटकावत आहेत. त्यात आता मैदानात सरावासाठी बंदी घातल्याने पालकांनी नाराजी तीव्र व्यक्त केली.
ठाण्यात सिनेकलाकारांचे क्रिकेट सामने
शुक्रवारच्या दिवशी पहिला सामना मुंबईचे मावळे व बाणेदार ठाणे यांच्यात झाला. यामध्ये बाणेदार ठाणे संघ विजयी झाला. दुसरा सामना खतरनाक मुळशी विरु द्ध मीडिया लढवय्या यांच्यात पार पडला. यामध्ये खतरनाक मुळशी संघ विजयी झाला. तर, अंतिम सामना मुंबईचे मावळे व मीडिया लढवय्या यांच्यात झाला.
यामध्ये मीडिया लढवय्या संघ विजयी झाला. या तीन सामन्यांत मीडिया लढवय्याचा अनिकेत पाटील, बाणेदार ठाणेचा संदीप जुवाटकर, तर खतरनाक मुळशीचा उदय पाटील यांना मॅन आॅफ द मॅच म्हणून पुरस्कार देण्यात आले. या स्पर्धेत विजय केंकरे, राजेश शृंगारपुरे, संजय नार्वेकर, प्रथमेश परब, प्रवीण तरडे, विजय आंदळकर, अमित भंडारी आदी सिनेनाट्य कलाकार सहभागी होते.
पालकांनी सिंथेटिक ट्रॅकसंदर्भात चर्चा केली. त्यावर, तोडगा काढण्याचेही त्यांना सांगण्यात आले आहे. परंतु, यावेळी कोणत्याही प्रकारचा वाद किंवा अरेरावी झालेली नाही. यावर आयुक्तांसमवेत तोडगा काढला जाणार आहे.
- एकनाथ शिंदे, पालकमंत्री, ठाणे जिल्हा