ना देवेंद्रांचं नागपूर, ना मुख्यमंत्र्यांची मुंबई, स्वच्छता शहरांच्या रेटिंगमध्ये ओन्ली 'नवी मुंबई'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 05:40 PM2020-05-19T17:40:10+5:302020-05-19T18:13:13+5:30
देशाचे नगरविकासमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी आज देशातील फाईव्ह स्टार रेटिंग शहरांची घोषणा केली. त्यामध्ये, अंबिकापूर, राजकोट, सुरत, म्हैसूर, इंदौर आणि नवी मुंबई या शहरांनी स्थान मिळवले आहे
मुंबई - केंद्रीय नगरविकासमंत्री हरदीपसिंग पुर यांनी देशातील स्वच्छता व कचरामुक्त शहरांच्या फाईव्ह स्टार रेटिंगची घोषणा केली. त्यामध्ये, राज्यातील एकमेव शहराचा समावेश करण्यात आला, नवी मुंबईला हा बहुमान मिळाला आहे. देशात सन २०१८ पासून फाईव्ह स्टार रेटिंग शहरांची घोषणा करण्यात येत आहे. शहरातील स्वच्छता, कचरामुक्ती अभियान आणि इतर स्वच्छता, सुंदरता पाहून या शहरांचं रेटिंग ठरविण्यात येतं. केंद्र सरकारच्या या यादीत ना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मुंबई आली, ना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं नागपूर. या यादीत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाणे शहरालाही स्थान मिळालं नाही, पण नवी मुंबईने बाजी मारली आहे.
देशाचे नगरविकासमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी आज देशातील फाईव्ह स्टार रेटिंग शहरांची घोषणा केली. त्यामध्ये, अंबिकापूर, राजकोट, सुरत, म्हैसूर, इंदौर आणि नवी मुंबई या शहरांनी स्थान मिळवले आहे. तर देशातील ६५ शहरांना थ्री स्टार शहराने गौरविण्यात आले आहे. तर, ७० शहरांना १ स्टार रेटिंग देण्यात आलं आहे. याबद्दल हरदीपसिंग पुरी यांनी सर्वच शहरांचे अभिनंदन केले आहे.
Heartiest congratulations to Ambikapur, Rajkot, Surat, Mysuru, Indore & Navi Mumbai for receiving a 5-Star Rating, 65 cities for receiving a 3-Star Rating & 70 cities for receiving 1-Star Rating this year.
— Hardeep Singh Puri (@HardeepSPuri) May 19, 2020
I am sure this will inspire all cities to improve their ratings in future.
• अंबिकापुर, छत्तीसगढ़
• राजकोट, गुजरात
• मैसूर, कर्नाटक
• इंदौर, मध्य प्रदेश
• नवी मुंबई, महाराष्ट्र
दैनंदिन सफाई, सिंगल प्लास्टिक वापरावरील बंदी, नालेसफाई, वेस्ट मॅनेजमेंट यावर केंद्र सरकारचा भर आहे. त्यानुसारच, नवी मुंबई हे फाईव्ह स्टार रेटिंग मिळविणारं राज्यातील एकमेव शहर ठरलं असून मुंबई, पुणे, नागपूर ही शहरं थ्री स्टारच्या यादीतही नाहीत. त्यामुळे, नवी मुंबईकरांना फाईव्ह स्टार रेटिंगचा मोठा आनंद झाला आहे. नवी मुंबईपाठोपाठ ठाणे, भिवंडी व अंबरनाथ आणि मीरा भाईंदरला थ्री स्टार रेटिंग मिळाले आहे. तसेच, धुळे, जळगांव, माथेरान, शिर्डी, रत्नागिरी, पाचगणी, वेंगुर्ला आणि जेजुरी या शहरांनाही थ्री स्टार देण्यात आले आहेत.