एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही - एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2020 06:25 PM2020-10-22T18:25:21+5:302020-10-22T18:25:52+5:30
Eknath Shinde : जिल्ह्यात परतीच्या पावसाने भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची पाहाणी करण्यासाठी शिंदे यांनी गुरुवारी भिवंडी, शहापुर व मुरबाड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी केली आहे.
ठाणे : जिल्ह्यातील शेतकर्यांचे अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या परिस्थितीत राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागे सर्वशक्तीनिशी उभे आहे. जिल्ह्यातील नुकसानग्रस्त एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही, असे आश्वासन शेतकर्यांना देत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतीसह शेतकर्यांच्या सर्व नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करून तसा अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला गुरुवारी दिले.
जिल्ह्यात परतीच्या पावसाने भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची पाहाणी करण्यासाठी शिंदे यांनी गुरुवारी भिवंडी, शहापुर व मुरबाड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी केली आहे. त्याप्रसंगी त्यांनी शेतकर्यांना धिलासा देत नुकसानीचे पंचनामे त्वरीत करुन अहवाल तत्काळ पाठवण्याची तंबी त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिली आहे. या जिल्हा दौऱ्याप्रसंगी पालकमंत्र्यांनी भिवंडी तालुक्यातील कांदळी, मुरबाड तालुक्यातील शिदगाव, शहापुर तालुक्यातील वेलहोळी येथील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. यावर्षी एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही असे आश्वासन त्यांनी यावेळी शेतकरी बांधवांना दिले.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते. यावर्षी भिवंडी तालुक्यात सुमारे १६ हजार हेक्टर भातशेतीची तालुक्यात लागवड करण्यात आली होती. मात्र परतीच्या पावसाने सुमारे आठ हजार पेक्षा अधिक भात शेतीचे नुकसान झाले आहे. मुरबाड तालुक्यात १५ हजार ५११ हेक्टरपैकी सुमारे १२ हजार हेक्टर तर शहापूर तालुक्यात १४ हजार १५५ हेक्टर क्षेत्रापैकी १२ हजार ५०० हेक्टरहून भातशेतीचे नुकसान झाले असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. तसेच जिल्ह्यातील सर्व पिकविमा धारक शेतकऱ्यांचे सुचना पत्र प्राप्त करुन विमा कंपन्यांकडे सादर करण्याचे निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले आहेत.
पालकमंत्र्यां च्या या जिल्हा नुकसान पाहाणी दौऱ्यात ठाणे जिल्हा परिषद अध्यक्षा सुषमा लोणे, विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर , राज्याच्या हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, आमदार शांताराम मोरे , प्रांताधिकारी मोहन नळदकर , जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रुपाली सातपुते, जिल्हा कृषी अधिक्षक अंकुश माने, आरोग्य व बांधकाम समिती सभापती कुंदन पाटील , तहसीलदार अधिक पाटील आदी उपस्थित होते.