एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, पालकमंत्री एकनाथ शिंदेचे तातडीने अहवाल देण्याचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2020 10:08 AM2020-10-23T10:08:44+5:302020-10-23T10:09:35+5:30
सरकारी यंत्रणेच्या भोंगळ कारभारामुळे गेल्यावर्षी झालेल्या नुकसानीचा मोबदला अजूनही मिळाला नसल्याचा पाढा पालकमंत्र्यांसमोर वाचण्यात आला असता, यावर्षी एकही शेतकरी सरकारी मदतीपासून वंचित राहणार नाही, असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले.
भिवंडी : परतीच्या पावसाने ठाणे जिल्ह्यातील भातपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या भातपिकांची गुरुवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी तालुक्यातील कांदळी गावात पाहणी करत शेतकरी यांच्याशी संवाद साधला. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. तातडीने पंचनामे करून सरकारकडे तातडीने अहवाल पाठवण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकारी यांना दिले.
सरकारी यंत्रणेच्या भोंगळ कारभारामुळे गेल्यावर्षी झालेल्या नुकसानीचा मोबदला अजूनही मिळाला नसल्याचा पाढा पालकमंत्र्यांसमोर वाचण्यात आला असता, यावर्षी एकही शेतकरी सरकारी मदतीपासून वंचित राहणार नाही, असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले. भिवंडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते. यावर्षी तालुक्यात १६ हजार हेक्टरवर भातशेतीची लागवड करण्यात आली होती. मात्र, परतीच्या पावसाने सुमारे आठ हजारांहून अधिक भातशेतीचे नुकसान झाल्याची माहिती शिंदे यांनी दिली.
ठाणे जिल्ह्यात ४५ टक्के नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे पूर्ण झाले असून येत्या चार ते पाच दिवसांत उर्वरित सर्व पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. या पाहणी दौऱ्याप्रसंगी कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, राज्याच्या हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, आमदार शांताराम मोरे, प्रांताधिकारी मोहन नळदकर, ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुषमा लोणे, आरोग्य व बांधकाम समिती सभापती कुंदन पाटील, तहसीलदार अधिक पाटील, गटविकास अधिकारी डॉ. प्रदीप घोरपडे व कृषी अधिकारी उपस्थित होते.
मुरबाड तालुक्यातही पाहणी
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी शिदवाडी येथील भातशेतीची पाहणी केली. त्यांच्यासोबत जिल्हा कृषी अधिकारी अंकुश माने, तहसीलदार अमोल कदम, जिल्हा परिषद सदस्या प्राजक्ता भावार्थे, रेखा कंटे तसेच कृषी विभागाचे अधिकारी सोबत होते.
अवकाळी पावसाने मुरबाड तालुक्यात भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शिदगाव येथील चिमा शिद यांच्या शेताची पाहणी केली. यावेळी संपूर्ण पीक वाया गेल्याने शिद यांना अश्रू अनावर झाले. त्यांचे पाणावलेले डोळे पाहून पालकमंत्री यांनी धीर देत सरकारकडून योग्य ती मदत मिळेल, असे आश्वासन दिले. तशा सूचना जिल्हाधिकारी व कृषी अधिकारी यांना दिल्या. शिद यांच्या पाच एकरमधील सगळा भात कुजला आहे.