फुल नाही पण फुलाची पाकळी बरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:45 AM2021-08-17T04:45:58+5:302021-08-17T04:45:58+5:30
ठाणे : लोककलावंतांना राज्य सरकारने अलीकडेच पाच हजारांची मदत जाहीर केली आहे. ती पुरेशी असल्याच्या भावना काही लोककलावंतांनी व्यक्त ...
ठाणे : लोककलावंतांना राज्य सरकारने अलीकडेच पाच हजारांची मदत जाहीर केली आहे. ती पुरेशी असल्याच्या भावना काही लोककलावंतांनी व्यक्त केल्या आहेत, तर काही जणांनी काही नसल्यापेक्षा काहीतरी असलेले बरे, फुल नाही पण फुलाची पाकळी तरी मिळाली, असे मत व्यक्त केले आहे.
लोककलावंतांची यादी तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असून या कलावंतांकडून जनजागृतीचे कार्यक्रम सुरू केले जाणार आहेत. म्हणजे पाच हजारांच्या बदल्यात त्यांच्याकडून दहा कार्यक्रम करून घेतले जाणार आहेत. तीन जणांचा संच करून त्यांना कार्यक्रम करण्यास सरकारने सांगितले आहे. त्या बदल्यात त्यांना पाच हजार रुपये दिले जाणार आहेत. कोरोनाच्या संकटकाळात लोककलावंतांची फरफट झाली असली, तरी सरकारकडून जाहीर झालेल्या मदतीत समाधान मानत आहोत, असे त्यांनी सांगितले.
शासनाचे आदेश प्राप्त झाले की, मदत दिली जाणार आहे. अद्याप ठाणे जिल्ह्यातील यादी आलेली नाही. शासनाच्या सूचना आल्या की, आपण यादी तयार केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले.
----------------------------------
लोककलावंतांना केवळ पाच ते दहा मिनिटांचेच दहा कार्यक्रम करायचे आहेत आणि त्याबदल्यात त्यांना पाच हजार रुपये दिले जाणार आहे. कोरोनाच्या नियमांविषयी त्यांना घरोघरी जाऊन जागृती करण्यास सांगितले आहे. एकल कलावंतांसाठी मुख्यत्वे ही योजना आहे. परंतु, यात इतर लोककलावंतांनाही सहभागी करून घेतले आहे. एका संचात तीन जणांचा समावेश असावा, अशी अट आहे.
डॉ.प्रा. प्रकाश खांडगे, ज्येष्ठ लोककला अभ्यासक
----------------------------------
ठाणे जिल्ह्यात अंदाजे १५० लोककलावंत असल्याचे डॉ.प्रा. खांडगे यांनी सांगितले.
----------------------------------
प्रत्येक दिवसाचे प्रत्येकी ५०० रुपये. दिवसाला एका ग्रुपला १५०० रुपये, अशा पद्धतीने पाच हजार रुपये दिले जाणार आहे. आमचा आदिवासी भाग असून या भागाच्या दृष्टीने ही मदत पुरेशी आहे. या दिवसांत आम्ही शेतीची कामे करीत असतो. पावसाळ्यात हाती पैसे मिळत नसतात. परंतु, या दिवसांत सरकारकडून मदत मिळत असल्याने समाधानी आहोत. हाताला काम नसले की, आमचे कलाकार शेती करतात किंवा रानभाज्या विकतात.
- राजन वैद्य, आदिवासी कलावंत
...........
माझा मुलगा कामाला असल्याने मी पर्यायी काम केले नाही. परंतु, ऐन कोरोनाकाळात जेव्हा वाईट परिस्थिती होती, तेव्हा आधी जिथे कार्यक्रम केले तिथल्या लोकांना साद घातली, त्यांनी मदत केली. सरकारकडून आलेली मदत म्हणजे काही नसल्यापेक्षा काहीतरी असलेले बरे.
- अनिल शिंदे, लोककलावंत (गोंधळी)
......
कोरोनाकाळात काम नसल्याने मी नोकरी शोधत आहे, पण ती मिळत नाही. माझ्या बरोबरीचे कलाकार डिलिव्हरी बॉय म्हणून काम करीत आहेत. सरकारला विनंती आहे की, आम्हाला आमचे व्यासपीठ द्यावे. पाच हजार रुपये ही तुटपुंजी मदत असली, तरी आलेल्या मदतीत समाधान मानावे लागत आहे.
- विनोद निंबाळकर, लोककलावंत