पोटाला अन्न नाही, लस कशाला हवी? आदिवासी बांधवांची व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 09:33 AM2021-05-10T09:33:25+5:302021-05-10T09:38:53+5:30

लाॅकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या रोजगारावर संक्रांत आली असल्याने खेडोपाड्यात रोजंदारीवर काम करणाऱ्यांची रोजगाराअभावी उपासमार होत असताना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रताही भयानक असल्याने दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे.

No food for stomach, why vaccine? The plight of the tribal brothers | पोटाला अन्न नाही, लस कशाला हवी? आदिवासी बांधवांची व्यथा

पोटाला अन्न नाही, लस कशाला हवी? आदिवासी बांधवांची व्यथा

Next

प्रकाश जाधव -

मुरबाड : कोरोनामुळे पुरेसे अन्न, पाणी मिळत नसल्याने आम्ही कसेबसे दिस काढतोय. काय करू घेऊन कोरोनाची लस, अशी व्यथा आहे मुरबाडमधील मांदोशी, सिध्दगड, धानकी, मढ, हुबांची वाडी, धारखिंड या दुर्गम भागात वास्तव्य करणाऱ्या आदिवासी बांधवांची. ते हलाखीचे जीवन जगत असताना त्यांचा विचार न करता सरकारने लाॅकडाऊन लागूू केल्याने गोरगरीब नागरिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्र ऐरणीवर आला आहे.

लाॅकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या रोजगारावर संक्रांत आली असल्याने खेडोपाड्यात रोजंदारीवर काम करणाऱ्यांची रोजगाराअभावी उपासमार होत असताना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रताही भयानक असल्याने दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. हे टाळण्यासाठी सरकारने लस घेणे सक्तीची केली असली तरी ही लसीच्या फायद्यांची जाणीव आदिवासी बांधवांमध्ये नसल्यामुळे ते लस घेण्यास तयार होत नाहीत. शिवाय ही लस घेण्यासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणे त्यांना जमत नाही. आदिवासी बांधवांमध्ये अगोदर शिक्षणाचा अभाव असल्याने त्यांना इंटरनेटचा गंध नाही. तसेच हे रजिस्ट्रेशन मोबाइलवरून करायचे आहे. परंतु काही कुटुंब अशी आहेत की त्यांच्याकडे मोबाइल असला तर तो साधा. त्याला कधी नेटवर्क असेल याची खात्री नाही. काही ठिकाणी विजेची व्यवस्था नसल्यामुळे तो मोबाइल चार्जिंगही होत नाही.

आमची मोबाइल घेण्याची ऐपत नाही. जर घेतला तर तो वापरण्याचे ज्ञान नाही. कोरोनाची लस घेतली तर माणूस दगावतो असा त्यांचा समज आहे. यावर मात करण्यासाठी व त्यांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी मुरबाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रमेश अवचार यांनी सुमारे आठशे शिक्षक केंद्र प्रमुख, ग्रामसेवक यांची पथके तयार केली आहेत. ही पथके अतिदुर्गम भागात जाऊन आदिवासी बांधवांना लस घेण्यासाठी प्राेत्साहित करीत असले तरी सध्या कडक लाॅकडाऊनमुळे दळणवळणाची साधने बंद आहेत. ज्यांच्याकडे दुचाकी वाहन आहे ते लसीकरणासाठी जातात. परंतु अनेक जण उदरनिर्वाहासाठी रोजगाराच्या शोधात जातात. रोजगार बुडवून लस घेण्यासाठी जाणे त्यांना महत्त्वाचे वाटत नाही.
 

Web Title: No food for stomach, why vaccine? The plight of the tribal brothers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.