निधी नाही; तरीही नगर पालिकेची कोटींची उड्डाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2015 11:25 PM2015-09-03T23:25:55+5:302015-09-03T23:25:55+5:30
अंबरनाथ नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर झालेली पहिलीच सर्वसाधारण सभा वादात अडकली आहे. आर्थिक तरतुदीपेक्षा चारपट जास्त विकास कामांना मंजुरी देण्याचा प्रताप पालिकेने केला आहे
पंकज पाटील, अंबरनाथ
अंबरनाथ नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर झालेली पहिलीच सर्वसाधारण सभा वादात अडकली आहे. आर्थिक तरतुदीपेक्षा चारपट जास्त विकास कामांना मंजुरी देण्याचा प्रताप पालिकेने केला आहे. मंजुरी दिलेल्या विकास कामांच्या खर्चाचा आकडा हा २५० कोटींच्या घरात असून तिजोरीत अवघे ६० कोटीच शिल्लक असल्याने ही सर्व कामे रखडणार आहेत.
अंबरनाथ पालिकेच्या अर्थसंकल्पाला बगल देऊन कोटी -कोटींची कामे मंजूर करुन घेऊन शहरात विकास कामे करण्याचे स्वप्न अंबरनाथ पालिकेतील सत्ताधारी पाहत आहेत. पहिल्याच सर्वसाधारण सभेत २५० कोटीपेक्षाही जास्तीच्या विकास कामांना मंजुरी दिली. मात्र ती देतांना पालिकेची आर्थिक स्थिती पाहण्यात आलेली नाही. या मंजूर विकास कामांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतल्यावर खरे सत्य अंबरनाथकरांपुढे आले. मंजूर कामांसाठी किती आर्थिक तरतूद शिल्लक आहे याचा खुलासा जिल्हाधिकाऱ्यांनी मागितल्यावर पालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेना अडचणीत सापडली आहे. जो पर्यंत मंजूर विकास कामांचा अर्थसंकल्पीय तरतुदीसोबत ताळमेळ बसत नाही तोपर्यंत ती स्थगित ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
विकासकामांसाठी प्रतीक्षा : अशा परिस्थितीत मंजूर कामांपैकी कोणती कामे अर्थसंकल्पीय तरतुदीत बसवायची याची चाचपणी मुख्याधिकाऱ्यांनी सुरु केली आहे. अर्थसंकल्पातील मंजूर निधीप्रमाणे विकास कामे जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविल्यावरच शहरात कामे करता येणार आहेत. सर्वसाधारण सभेत २५० कोटींची कामे मंजूर आहेत. मात्र पालिकेकडे अवघे ६० कोटीच शिल्लक आहे. त्यामुळे १९० कोटींच्या विकास कामांसाठी नगरसेवकांना आणि अंबरनाथकरांना प्रतिक्षा करण्याची वेळ आली आहे.
२५० कोटींची विकास कामे मंजूर करतांना आर्थिक तरतूद होईल त्या प्रमाणे कामे करण्याचे आश्वासन पालिका प्रशासनाने सभागृहात दिले होते. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगिती दिल्यावर याच प्रशासनाने लेखी पत्र देऊन या कामांसाठी केवळ ६० कोटींची तरतूद असल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे प्रशासनाने नगरसेवकांची आणि सभागृहाची दिशाभूल केली आहे.