गटबाजी आणि कुरबुरी नको, टीमवर्क हवे; राजेश टोपेंनी कार्यकर्त्यांना दिल्या कानपिचक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 12:04 AM2020-11-11T00:04:48+5:302020-11-11T00:04:55+5:30

जनमानसात संघटना बळकट करण्याचे आवाहन

No groupings and quarrels, no teamwork | गटबाजी आणि कुरबुरी नको, टीमवर्क हवे; राजेश टोपेंनी कार्यकर्त्यांना दिल्या कानपिचक्या

गटबाजी आणि कुरबुरी नको, टीमवर्क हवे; राजेश टोपेंनी कार्यकर्त्यांना दिल्या कानपिचक्या

Next

कल्याण :  एकमेकांची उणीदुणी काढू नका, अंतर्गत गटबाजी नको, कुरबुरीही नको, टीमवर्क हवे अशा शब्दांत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मंगळवारी कानपिचक्या लगावल्या. स्थानिक पातळीवर पक्ष क्षीण झाला आहे. पक्ष वाढला पाहिजे. केडीएमसीच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत, जनमानसात जाऊन काम करा, पक्ष संघटन बळकट करा, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.

पश्चिमेतील खडकपाडामधील एका क्लबमध्ये मंगळवारी विशेष बैठक पार पडली. कल्याण डोंबिवली शहर जिल्हा निरीक्षक म्हणून टोपे आणि आमदार विद्या चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.  या वेळी आनंद परांजपे, जगन्नाथ शिंदे, सुभाष पिसाळ, प्रमोद हिंदूराव, रमेश हनुमंते आदी स्थानिक नेत्यांसह अन्य प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित 
होते. 

पक्ष वाढविण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करताना टोपे म्हणाले, कल्याण डोंबिवलीत प्रत्येक जिल्ह्यातून लोक राहायला आले आहेत. 
संघटन मजबूत असणे गरजेचे आहे. हाच बैठकीमागचा मुख्य उद्देश आहे. जनतेसाठी काम करा. त्याचा योग्य तो मोबदला आपल्याला मिळतोच. संघटन बळकट होण्यासाठी कार्यकर्ता सक्रिय असला पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी मार्गदर्शन केले.

लवकरच जिल्हाध्यक्षांची निवड

रिक्त असलेल्या कल्याण-डोंबिवली जिल्हाध्यक्ष पदाबाबत बोलताना टोपे यांनी लवकरच जिल्हाध्यक्ष निवडला जाईल, असे बैठकीत स्पष्ट केले. या वेळी त्यांनी जिल्हाध्यक्षपद भूषविलेल्या रमेश हनुमंते यांच्या कामाचे कौतुकही केले. पक्ष संकटात असताना हनुमंते यांनी पक्षवाढीचे काम केले. त्यांनी आता वरिष्ठ पातळीवर पक्षाचे काम करावे अशी नेत्यांची इच्छा असल्याचे टोपे म्हणाले.

शिंदे यांना जिल्हाध्यक्षपदासाठी पसंती

कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्षपदासाठी माजी आमदार जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांच्या नावाला मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे. यासंदर्भात मंगळवारच्या बैठकीत बहुतांश जणांनी टोपे यांना निवेदने दिली आहेत. गेल्या आठवड्यात पार पडलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत शिंदे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात यावी, असा ठरावही एकमताने मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.‘

Web Title: No groupings and quarrels, no teamwork

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.