राजकारणात दूरदृष्टीचा अभाव; राज ठाकरे यांची खंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 09:44 PM2018-10-07T21:44:52+5:302018-10-07T21:58:43+5:30
ठाण्यातील एका नेत्रालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राजकारणी नेत्यांकडे दृरदृष्टीचा अभाव असल्याचे प्रतिपादन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : नेत्ररोगतज्ज्ञ असो, डेन्टिस्ट अथवा अन्य कोणताही डॉक्टर त्यांच्याकडे दूरदृष्टी असते. राजकारणात मात्र दूरदृष्टीचा अभाव प्रकर्षाने जाणवत असल्याची खंत महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्यातील एका कार्यक्रमात व्यक्त केली. ही खंत व्यक्त करतानाच अशा दूरदृष्टीच्या लोकांनी राजकारणात आले पाहिजे, असेही ते म्हणाले.
घोडबंदर रोडवरील मानपाडा येथील एका नेत्रालयाच्या उद्घाटनासाठी राज ठाकरे रविवारी ठाण्यात आले होते. या कार्यक्रमात त्यांनी आपले मत व्यक्त केले. जवळ असलेलेही राजकारण्यांना दिसत नाहीत. ड्राय (कोरड्या) झालेल्या डोळ्यांच्या आजारावर उपचार होतील, पण कोरड्या चेहºयांचे काय करायचे, असा सवाल करून उपस्थितांचे लक्ष वेधले. एखाद्या रुग्णालयाच्या, रुग्णवाहिकेच्या किंवा अशा नेत्रालयाच्या उद्घाटनाला गेल्यानंतर काय बोलावे, हाही प्रश्न पडतो, असे बोलून त्यांनी उपस्थितांमध्ये हशा पिकवला. लहान मुलांचे नंबर वाढण्याला त्यांच्या हातातील मोबाइल हेही एक कारण असल्याचे ते म्हणाले. डॉक्टर हा देवानंतरचा अवतार असल्याचे सांगत त्यांनी डॉ. नितीन देशपांडे यांच्याबद्दल गौरवोद्गारही काढले.
ज्येष्ठ संगणक अभ्यासक अच्युत गोडबोले, ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती सुधाकर चव्हाण, ठाणे महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. आर.टी. केंद्रे आदींसह अन्य डॉक्टर यावेळी उपस्थित होते.
.............................
राज यांच्या फोटोसाठी धडपड
राज ठाकरे घोडबंदर रोडवरील एका नेत्रालयाच्या उद्घाटनासाठी आले असल्याची वार्ता मनसैनिकांसह सामान्य नागरिकांमध्ये पसरल्यानंतर कार्यक्रम संपण्याची वाट पाहत त्यांचे अनेक कार्यकर्ते ‘दोस्ती इम्पेरिया’ या इमारतीखाली उभे होते. ते बाहेर पडल्यानंतर तन, मन, धनसे फक्त मनसे मनसे... अशा घोषणा त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिल्या. त्यानंतर, ते गाडीमध्ये बसेपर्यंत अनेक तरुणांनी त्यांचा फोटो क्लिक करण्यासाठी मोबाइल समोर घेतले. मनसेचे नेते अभिजित पानसे, जिल्हाप्रमुख अविनाश जाधव, मनविसे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे, शहराध्यक्ष रवी मोरे आणि शाखाध्यक्ष संतोष निकम आदी यावेळी उपस्थित होते.