साडेसात लाखांना नाही ‘आधार’
By admin | Published: June 15, 2017 03:05 AM2017-06-15T03:05:35+5:302017-06-15T03:05:35+5:30
केंद्रातील मोदी सरकारने सर्व व्यवहार आधार कार्डाशी जोडण्याचे फर्मान काढल्याने प्रत्येक व्यक्तीला ‘आधार’ सक्तीचा झाला आहे. परंतु एप्रिलपासुन तांत्रिक कारणे सांगत
- राजू काळे । लोकमत न्यूज नेटवर्क
भार्इंदर : केंद्रातील मोदी सरकारने सर्व व्यवहार आधार कार्डाशी जोडण्याचे फर्मान काढल्याने प्रत्येक व्यक्तीला ‘आधार’ सक्तीचा झाला आहे. परंतु एप्रिलपासुन तांत्रिक कारणे सांगत सर्व आधार केंदे्र बंद करण्यात आल्याने एकट्या ठाणे जिल्ह्यातील सुमारे साडेसात लाख लोक आधार नोंदणीपासून वंचित राहिल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने जारी केलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यातच ऐन शाळा सुरु होण्याच्या काळात विद्यार्थ्यांचीही पंचाईत होणार असल्याचे स्पष्ट झाले.
शाळेतील विद्यार्थ्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. अनेकदा चार ते सात वर्षाच्या मुलांच्या हाताचे ठसे स्पष्ट दिसून येत नसल्याने त्यांची आधार नोंदणी करण्यात येत नव्हती. अखेर त्यांच्या नावासह केवळ छायाचित्राचा समावेश असलेली आधार नोंदणी सुरु करण्यात आली. यामुळे प्रत्येक शाळेने विद्यार्थ्यांची नोंदणी सक्तीची केली. त्याची मागणी पालकांकडे करण्यात येऊ लागली. यातच एप्रिलपर्यंत सुरु असलेली आधार नोंदणी अचानक बंद करण्यात आल्याने नागरिकांची पंचाईत झाली.
नोंदणीसाठी वापरण्यात येणाऱ्या संगणक प्रणालीचे अपग्रेडेशन करण्याचा निर्णय सरकारने फेब्रुवारीमध्ये घेतला होता. त्याला संबंधित कंपन्यांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला. परिणामी आधार नोंदणीचे काम करणऱ्या मेसर्स पीपल सर्व्हिसेस टेक्नॉलॉजीज प्रा. लि. या कंपनीने आधार नोंदणी करणाऱ्या सर्व एजन्सींचे काम बंद केले. त्यामुळे एप्रिल महिन्यापासून आधार नोंदणी बंद पडली आहे. त्याचवेळी बँकांकडूनही आधार कार्डाची मागणी केली जात आहे. आधार कार्ड वेळेत सादर न केल्यास त्यांचे बँकेतील व्यवहार रोखण्याचा इशारा बँकांनी दिली आहे.
तसेच रेशनकार्डाला आधार संलग्न करण्यासाठीही पुरवठा कार्यालयाकडून आधार कार्डाची मागणी केली जात आहे. त्याची प्रत निश्चित वेळेत जमा न केल्यास रेशनवरील धान्य मिळणार नसल्याचा आदेश काढण्यात आला आहे. त्यामुळे आधार नोंदणी न केलेल्या गरीब व सामान्य कुटुंबाची परवड होण्याची शक्यता आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनाही आधारची सक्ती करण्यात आली आहे. शाळा सुरु होण्यास केवळ एक दिवसाचा अवधी असताना ही मागणी झाली. त्यामुळे आता वंचित विद्यार्थ्यांना आधार कार्ड मिळण्यात अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र केंद्रे सुरू झालेली नाहीत.
७७ लाखांची आधारनोंदणी
२०१५ मधील नोदींनुसार ८५ लाख २९ हजार २१७ इतक्या लोकसंख्येपैकी ७७ लाख ७९ हजार १२७ लोकांनी आधार नोंदणी केल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने स्थानिक प्रशासनांना पाठविलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
अद्याप सात लाख ५० हजार ९० व्यक्ती आधार नोंदणीपासून वंचित असून त्यांच्यासाठी त्वरित आधार नोंदणी केंद्र सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नागरिकांसह विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी बंद पडलेली आधार नोंदणी सुरु करण्याचे काम त्वरित केले जाणार आहे. - सुधीर राऊत, अतिरिक्त आयुक्त
आधार कार्ड हा भविष्यात एकमेव पुरावा ग्राह्य धरला जाणार असल्याने प्रत्येकाला आधार नोंदणी बंधनकारक आहे. त्यासाठी त्याची सोय उपलब्ध करुन देण्यासाठी पालिकेला निर्देश देण्यात आले आहेत.
- अरुण देशपांडे, राज्य ग्राहक सुरक्षा आयोगाचे अध्यक्ष