विरोधी पक्षांनी कितीही एकत्र आले तरी २०२४ मध्ये नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान

By जितेंद्र कालेकर | Published: August 16, 2021 09:38 PM2021-08-16T21:38:43+5:302021-08-16T21:40:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : विरोधी पक्षांनी कितीही एकत्र आले तरी नरेंद्र मोदी हेच २०२४ मध्ये देशाचे पंतप्रधान होतील, ...

No matter how many opposition parties come together, Narendra Modi will be the Prime Minister of the country in 2024 | विरोधी पक्षांनी कितीही एकत्र आले तरी २०२४ मध्ये नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान

केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील

Next
ठळक मुद्दे केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटीलजन आशीर्वाद यात्रेला ठाण्यातून प्रारंभ




लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: विरोधी पक्षांनी कितीही एकत्र आले तरी नरेंद्र मोदी हेच २०२४ मध्ये देशाचे पंतप्रधान होतील, असा विश्वास केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सोमवारी ठाण्यात व्यक्त केला. नियोजित नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव दिले जावे, ही स्थानिक भूमीपुत्रांचीच इच्छा आणि मागणी असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला.
ठाणे जिल्ह्यातून केंद्रीय मंत्रिमंडळात प्रथमच समावेश झालेल्या पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठाणे आणि रायगड जिल्ह्यात पाच दिवस जन आशीर्वाद यात्रा काढण्यात आली आहे. याच यात्रेचा प्रारंभ ठाण्यातील आनंदनगर चेकनाका येथून सोमवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास झाला. त्यानंतर ठाणे शहरातील इंदिरानगर वागळे इस्टेट, नितीन कंपनी, पाचपाखाडी मार्गे ही यात्रा मासुंदा तलाव येथे आली. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळयाला पुष्पहार अर्पण केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना आपले मनोगत व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, मोदी हे जनताभिमुख कारभार करीत आहेत. त्यांच्या स्वातंत्र्यदिनानिमित्तच्या भाषणावरही देशातील तरुणाईने चांगले रँकींग दिले आहे. देशाची युवा पिढी, आणि जनता मोदींचे नेतृत्व मान्य करते. राजकारणाची दिशा वेगळी करण्यासाठी देशातील विरोधी पक्षनेते एकत्र येत आहेत. कितीही पक्ष एकत्र आले तरी २०२४ मध्ये मोदी हेच पंतप्रधान होतील, ही काळया दगडावरची रेघ आहे.
* भ्रष्टाचार करणारे, चोऱ्या करणारे एकत्र आले की समजायचे राजाचा कारभार हा योग्य दिशेने चालला आहे, असे चाणक्य नितीमध्ये २५०० वर्षांपूर्वी म्हटले असल्याचा टोलाही त्यांनी विरोधी पक्षांना दिल्लीत एकत्र येत बैठक घेतल्याचा मुद्दयावर लगावला.
* दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला दिले जावे, ही मागणी जरी आपण लोकसभेत २०१५ मध्ये केली असली तरी ती केवळ आपली वैयक्तिक मागणी नसून ती भूमीपूत्रांची ठाम मागणी आहे. मात्र राज्य शासनाने सिडकोच्या माध्यमातून प्रस्ताव पारीत करुन वेगळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची भूमीका घेतली. दि. बांच्या नावासाठी आम्ही सर्वजण आग्रही आहोत. अगदी अलिकडेही संघर्ष समितीच्या मंडळींनी दिल्लीत आपली भेट घेतली असून नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांचीही भेट घेऊन त्यांनाही वस्तूस्थिती समजून सांगितल्यानंतर त्यांनीही सकारात्मक भूमीका घेतली. त्यामुळेच भूमीपुत्रांच्या मागणीवर आपणही खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले.
* ठाण्याला केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यानेच आभार-
जनतेमुळे खासदार आणि मोदींमुळे मंत्रि झालो. देशाची प्रधानमंत्र्यांची सूचना आहे की, लोकांची कामे करण्यासाठी जनआशीर्वाद घ्या. यात निवडणूकांचा काहीही संबंध नाही. ७४ वर्षांनी ठाण्याला मंत्रीपद भूषविण्याची संधी मिळाल्यानेच आभार प्रदर्शनासाठी ही आशीर्वाद यात्रा असल्याचा दावाही पाटील यांनी यावेळी केला.
* यावेळी ठाण्याचे आमदार संजय केळकर, जिल्हाध्यक्ष तथा आमदार निरंजन डावखरे आणि अ‍ॅड. संदीप लेले यांच्यासह भाजपचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
 

 

Web Title: No matter how many opposition parties come together, Narendra Modi will be the Prime Minister of the country in 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.