उमेदवार कोणीही असला तरी प्रत्येक जागेची जबाबदारी भाजपाची असेल- चंद्रशेखर बावनकुळे
By अजित मांडके | Published: October 17, 2023 01:06 PM2023-10-17T13:06:09+5:302023-10-17T13:06:27+5:30
लोकसभा प्रवास अंतर्गत मंगळवारी बावनकुळे हे ठाण्यात आले होते, यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
ठाणे : कोण, कुठे उभा राहणार, कोणती जागा कोणाला मिळणार याचा निर्णय केंद्रीय पार्लमेंटरी कमिटी, राज्यातील महायुतीचे तीन नेते आणि इतर घटक पक्षातील महत्त्वाचे नेते हा निर्णय घेतील. आमच्यात कुठेही मतभेद नाहीत किंवा मनभेदही नाहीत, उमेदवार कोणी जरी असला तरी प्रत्येक जागेची जबाबदारी ही भाजपचीच असेल असे मत भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
लोकसभा प्रवास अंतर्गत मंगळवारी बावनकुळे हे ठाण्यात आले होते, यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. राज्यात महाविजय २०२४ ची तयारी सुरू आहे त्यानुसार राज्यातून ४५ खासदार ५१ टक्के मते घेऊन मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.५१ टक्के मते ही भाजपची असतील मग महायुतीचा उमेदवार कोणी असेल त्याला भाजप निवडून आणेल असेही ठामपणे त्यांनी सांगितले. तसेच विधानसभा निवडणुकीतही महायुतीचे 225 आमदार असतील असा दावाही त्यांनी केला.
ठाणे असेल किंवा कल्याण डोंबिवली असेल अथवा राज्यातील इतर ठिकाणी कुठेही कोणामध्ये मतभेद नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. चंद्रकांत पाटील यांच्या नाराजीबाबत त्यांना चिडले असता त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला. ठाण्यात ६०० वॉरियर्स हे साडेतीन लाख घरापर्यंत जाऊन जनतेला सरकारने केलेला कामांची माहिती देतील तसेच जनतेच्या मनात असलेले गैरसमज ही दूर करतील असेही त्यांनी सांगितले.
इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही
मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही सर्व पक्षांची इच्छा आहे. यापूर्वीच मराठ्यांना आरक्षण मिळाले असते मात्र उद्धव ठाकरे यांनी केलेल्या चुकांमुळे ते आरक्षण मिळू शकले नाही. मात्र आता आमची भावना हीच आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावे. परंतु हे आरक्षण देत असताना इतर समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागू दिला जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.