अपंगांचा अनुशेष तीन महिन्यात खर्च न केल्यास बैठक नाही थेट आंदोलन, आमदार बच्चू कडू यांचा ठाणे महापालिकेला इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 04:49 PM2017-12-02T16:49:59+5:302017-12-02T16:54:59+5:30
येत्या तीन महिन्यात अंपगांचा अनुशेष भरुन काढला नाही तर बैठक नाही तर प्रहार स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे.
ठाणे - अपंगासाठी असलेला १२८ कोटींचा अनुशेष १८ वर्षात खर्चच झाला नसून काही रक्कम ही अंपग कर्मचाऱ्यांच्या योजनांसाठी तर काही रक्कम जीम आणि इतर कामांसाठी खर्च करण्यात आल्याचा भांडाफोड आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. यासंदर्भात पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेतल्यानंतर येत्या तीन महिन्यात यातील किमान ३० ते ३५ कोटींचा अनुशेष खर्च करावा अन्यथा प्रहार स्टाईलने आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
दिव्यांगांच्या विविध समस्यांसंदर्भात शनिवारी कडव यांनी ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेतली. यावेळी आयुक्त आणि त्यांच्यात साधारपणे तासभर चर्चा झाली. या चर्चेनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि अंपगांच्या अनुशेषबाबत भांडाफोड केला. दरम्यान या चर्चे अंती अपंगासाठी १५०० गाळे, तसेच बीएसयुपीच्या घरांमध्ये देखील दिव्यागांना आरक्षण दिले जाईल, तसेच शॉपिंग मॉल आणि घरोघरी जाऊन अपंगांचा सर्व्हे करण्याचे आश्वासन पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. या विविध मुद्द्यावरून जागतिक अपंग दिनानिमित्त उपोषण करण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला होता. मात्र पालिका आयुक्तांकडून सर्व बाबींची पूर्तता करण्याचे आश्वास मिळाले असल्याने तीन महिन्यांसाठी आंदोलन मागे घेत असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
आमदार बच्चू कडू हे पालिका आयुक्तांची पालिका मुख्यालयात भेट घेणार असल्याने पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता. एक तास पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यासोबत झालेल्या चर्चेमध्ये त्यांनी अनेक मुद्दे आयुक्तांच्या लक्षात आणून दिले. यासंदर्भात त्यांनी आयुक्तांना निवेदन देखील दिले असून या निवेदनामध्ये अपंगाच्या योजनांबाबत अनेक गंभीर बाबी उघड केल्या आहेत. १९९३ साली अपंग कायदा होऊनही ठाणे महापालिकेने या कायद्याची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे तीन टक्के निधी खर्च न झाल्याने १२८ कोटींचे अपंगाचे नुकसान झाले असल्याचे या निवेदनामध्ये म्हंटले आहे. १९९३ पासून २८ कोटींपैकी केवळ ५ टक्के रक्कम खर्च करण्यात आली असून त्यायाठी जिम, लिफ्ट, आणि इतर कामांसाठी हा निधी खर्च करण्यात आला असल्याचे कडू यांनी सांगितले. २०१३ ते २०१७ या काळातील अनुशेषाची सरासरी ३०० टक्के तर खर्चाचा अनुशेष ८२ टक्के आहे. २५ हजार अपंगांपैकी केवळ १४३ अपंगांना गाळे वाटप करण्यात आले असून त्यातही ७० टक्के गाळे बंद असल्याचे त्यांनी सांगितले. स्टॉलसाठी १००२ अर्ज करण्यात आले होते मात्र ते अर्ज देखील बाद करण्यात आले आहे. अशा सर्व मुद्द्यांवर पालिका आयुक्तांशी शनिवारी आमदार बच्चू कडू यांनी चर्चा केली.
तीन महिन्यात १२८ कोटींचा अनुशेष खर्च करण्याबरोबरच अपंगांना १५०० गाळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच खास अपंगासाठी शॉपिंग प्लाझा तयार करण्यात येणार असून यामध्ये वरती अपंगांची राहण्याची सोय तर खाली गाळे देण्यात येणार असल्याची माहिती कडून यांनी दिली. याशिवाय घरोघरी जाऊन अपंगांचा सर्व्हे देखील केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र या सर्व गोष्टींसाठी तीन महिन्यांची डेडलाईन देण्यात आली असून त्यानंतर मात्र मीटिंग होणार नसून प्रहार स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा कडू यांनी दिला.