ठाणे लोकसभेसाठी कुठलीच नावे चर्चेत नाही, नरेश म्हस्के यांचे स्पष्टीकरण
By अजित मांडके | Published: February 22, 2024 06:25 PM2024-02-22T18:25:06+5:302024-02-22T18:25:51+5:30
आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यावर ठाणे लोकसभा मतदारसंघावर महायुतीच्या तिन्ही पक्षाकडून आपापल्या पद्धतीने दावे दाखल केले गेले.
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. त्यातच महायुतीच्या तिन्ही पक्षांनी या मतदारसंघावर दावा केला आहे. त्यातून तिन्ही पक्षांच्या इच्छुकांची नावे पुढे येत असताना, शिवसेना शिंदे गटाचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी ठाणे लोकसभेसाठी कुठलीच नावे चर्चेत नसल्याचे स्पष्टीकरण देत, या मतदारसंघात वरिष्ठ जो उमेदवार देतील, त्याचे काम करणारा असून पक्षीय भेदभाव आम्ही बाजूला ठेवणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले
आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यावर ठाणे लोकसभा मतदारसंघावर महायुतीच्या तिन्ही पक्षाकडून आपापल्या पद्धतीने दावे दाखल केले गेले. त्यातूनच भाजपाकडून माजी खासदार संजीव नाईक, विनय सहस्रबुद्धे, आमदाफ संजय केळकर तर शिवसेनेकडून आमदार प्रताप सरनाईक,माजी आमदार रवींद्र पाठक, माजी महापौर नरेश म्हस्के आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून माजी खासदार आनंद परांजपे यांची नावे इच्छुकांच्या यादीत पुढे येत आहे. याबाबत म्हस्के यांना विचारले असता, महायुतीत सध्यातरी कुठली ही नावे चर्चेत नाहीत.
कुठल्याही पक्षाचा उमेदवार जाहीर होईल, त्यावेळी तो आपला उमेदवार, आमचा उमेदवार, मी उमेदवार आहे. अशा पद्धतीने ठाणे लोकसभा मतदारसंघात आम्ही काम करणार आहोत. त्यामुळे हा इच्छुक, तो इच्छुक,मी इच्छुक असे काही नाही. तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील, तो आम्ही मान्य करून काम करणार आहोत असेही म्हस्के यांनी यावेळी स्पष्ट केले. तर पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित दादा पवार यांनी पंतप्रधान मोदी यांना जो शब्द दिला आहे. तो म्हणजे महाराष्ट्रात ४८ जागा निवडून आणण्याचा तो शब्द आम्हीं पाळणार आहोत. यासाठी दिलेला उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही काम करणार आहोत, यावेळी पक्षीय भेदभाव आम्ही बाजूला ठेवणार असल्याचेही यावेळी म्हस्के यांनी जाहीर केले.
रविवारी ठाण्यातील जाहीर सभेत आदित्य ठाकरे यांनी पुनरुचार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात लढण्याचे जाहीर आव्हान दिले. त्यावर म्हस्के यांनी ठाणे तर लांबच आहे, कल्याण मध्ये लढा आमच्या विरोधात सर्वांनी लढा असा टोला लगावला. जर तुमच्या हिम्मत असेल तर वरळीत लढा.वरळी सोडून शिवडी हा पर्याय का शोधता असा सवाल उपस्थित करत, आदित्य ठाकरे हे बालिश असल्याचाही उल्लेख केला.