आर्थिक मंदीमुळे ठाण्यात नवे प्रकल्प नाहीत; जुन्याच योजनांवर भर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 12:03 AM2020-03-12T00:03:05+5:302020-03-12T00:03:21+5:30

खर्च वाचविण्याचे प्रशासनाचे धोरण, लोकप्रिय घोषणा करण्याचा मोह टाळला

No new projects in Thane due to economic downturn; Emphasis on old plans | आर्थिक मंदीमुळे ठाण्यात नवे प्रकल्प नाहीत; जुन्याच योजनांवर भर

आर्थिक मंदीमुळे ठाण्यात नवे प्रकल्प नाहीत; जुन्याच योजनांवर भर

Next

ठाणे : ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पदभार सोडल्याचे परिणाम यंदाच्या अर्थसंकल्पात दिसून आले आहेत. दायित्व, कर्जरोखे, शहर विकास विभागाला आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. यामुळे यंदाचे मूळ अंदाजपत्रक मागील वर्षीच्या तुलनेत ८१.८८ कोटींनी कमी झाले आहे. त्यानुसार, यंदाचे अंदाजपत्रक हे ३७८० कोटींचे झाले आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पात ठाणेकरांच्या मालमत्ताकरात कोणत्याही प्रकारची वाढ प्रस्तावित केली नसली, तरीदेखील पाणीदरात ५० ते ६० टक्के दरवाढ प्रस्तावित केली आहे. त्यातही नव्या कोणत्याही प्रकारच्या प्रकल्पांना हात न घालता, जुन्याच प्रकल्पांवर ठाणेकरांची बोळवण करण्याचा प्रयत्न पालिकेने केला आहे. पालिकेच्या वतीने केवळ क्लस्टरबाधितांसाठी संक्रमण शिबिर धोरण प्रस्तावित करण्यात आले आहे.

पार्किंग सुविधा : ज्युपिटर हॉस्पिटलशेजारी महानगरपालिकेच्या ताब्यातील सुविधा भूखंडावर १५५६ चारचाकी वाहनांसाठी वाहनतळ तसेच १० मजल्यांचे सुसज्ज वाहनतळ, पार्किंग प्लाझा विकसित करण्याचे काम कन्स्ट्रक्शन्स टीडीआरच्या माध्यमातून सुरू असून १९ व्या मजल्यापर्यंत काम पूर्ण झाले असून अंतर्गत फिनिशिंगचे काम सुरू आहे. त्यातून ११९ कोटींची पालिकेची बचत होणार आहे.

सार्वजनिक उद्याने विकसित करणे
बाळकुम - कोलशेत रोड येथे सेंट्रल पार्क विकसित करणे पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण दुसऱ्या टप्प्याचे काम हाती, घेण्यात आले आहे.

भांडवली खर्चाच्या प्रमुख बाबी :
२०१९-२०२० मध्ये भांडवली कामांसाठी २२२६.२३ कोटी तरतूद करण्यात आली. परंतु, प्रत्यक्षात रु . १४४७.०६ कोटीपावेतो सीमित राहील, असा अंदाज बांधला आहे. २०२०-२०२१ मध्ये भांडवली खर्चासाठी १९३७.४० कोटी प्रस्तावित आहे.

ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर यांनी बुधवारी स्थायी समिती सभापती राम रेपाळे यांना मूळ अंदाजपत्रक सादर केले. यात ठाणे शहराचा सर्वांगीण विकास करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. अंदाजपत्रकामध्ये महापालिकेने मागील काळात हाती घेतलेल्या योजना, प्रकल्पांवर अधिक भर दिला आहे.

२०१८-१९ मध्ये भांडवली कामांचे दोन ते तीन वर्षांच्या आर्थिक नियोजनासह दायित्व स्वीकारले आहे. त्यात्या वर्षात कामाच्या प्रगतीनुसार त्यासाठी निधी उपलब्ध केलेला आहे व यापुढेही करण्यात येईल. सदरचे दायित्व स्वीकारून मोठे रस्ते, पूल, पाणीपुरवठा, मलनि:सारण योजना, रस्त्यावरील दिवाबत्ती, घनकचरा व्यवस्थापन आदी प्रकल्पांची कामे हाती घेतली असून त्यातील काही कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. ती महसुली उत्पन्नातून पूर्ण करण्यात येत असून यासाठी कोणत्याही प्रकारचे कर्ज उभारावे लागले नाही.

स्थायी समिती सभापती राम रेपाळे यांना मूळ अंदाजपत्रक सादर करताना अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर. प्रशासनाने सादर केलेल्या २०१९-२० च्या अर्थसंकल्पात मालमत्ताकराच्या उत्पन्नात १०५ कोटींची घट दाखवून ते ७०५ कोटीऐवजी ६०० कोटी दाखविले आहेत.

Web Title: No new projects in Thane due to economic downturn; Emphasis on old plans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.