एका रात्रीत कुणी नेता होत नाही - राजन विचारे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 12:59 AM2020-08-16T00:59:54+5:302020-08-16T06:45:28+5:30
तुम्ही तुमच्या औकातीत राहा,असा इशाराही त्यांनी दिला.
ठाणे : व्हिडीओ बाइट देऊन एका रात्रीत कुणी नेता होत नाही, अशा शब्दांत शिवसेना खा. राजन विचारे यांनी मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यावर टीकास्र सोडले. उचलून नेण्याची भाषा करणाऱ्यांना त्यांची लायकी दाखवून देऊ. तुम्ही तुमच्या औकातीत राहा,असा इशाराही त्यांनी दिला. जाधव यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे शिवसेनेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मात्र, स्वत: शिंदे यांनी जाधव यांना फार महत्त्व न देण्याची भूमिका घेतली आहे.
जाधव यांनी केलेल्या आंदोलनानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली होती. त्यावेळी त्यांनी वसंत डावखरे, गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे या मंडळींचे राजकारण आता संपले असल्याची टीका केली होती. शहरात शिवसेना विरुद्ध मनसे असे बॅनर वॉर रंगले होते. आता या वादात विचारे यांनी उडी घेतली असून जाधव यांच्यावर हल्लाबोल केला आहे. प्रत्येक जण कर्तृत्वाने मोठा होत असतो, असा टोला त्यांनी जाधव यांना लगावला. डावखरे यांनी कितीतरी वर्षे काम केले. डावखरे आमदार आणि सभापती झाले. पालकमंत्री शिंदे हे देखील शाखाप्रमुख होते. पुढे नगरसेवक, सभागृह नेते, आमदार झाले. त्यानंतर मंत्री, पालकमंत्री, विरोधी पक्षनेते झाले. एवढी सर्व पदे मागील २५ ते ३० वर्षे त्यांनी ठाणे शहरात काम करीत असताना भूषवली आहेत, असे विचारे म्हणाले.
महामारीच्या काळात, शिंदे हे स्वत:च्या जीवाची पर्वा न करता कोविड हॉस्पिटलमध्येही जात होते. पण आपण केवळ त्या कम्पाउंड वॉलच्या बाहेर उभे राहून बाइट देत होतो, अशी टीका विचारे यांनी केली. ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेलो आहोत, त्यामुळे पोकळ धमक्या आम्हाला देऊ नका, असेही ते म्हणाले.