थकीत देणीप्रकरणी कोणालाही पळ काढता येणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 05:20 AM2021-02-28T05:20:27+5:302021-02-28T05:20:27+5:30
कल्याण : आंबिवली-मोहने येथील एनआरसी कंपनीतील साडेचार हजार कामगारांना त्यांची थकीत देणी मिळालीच पाहिजेतच. याप्रकरणी कोणालाही पळ काढता येणार ...
कल्याण : आंबिवली-मोहने येथील एनआरसी कंपनीतील साडेचार हजार कामगारांना त्यांची थकीत देणी मिळालीच पाहिजेतच. याप्रकरणी कोणालाही पळ काढता येणार नाही. कोणी कितीही मोठा माणूस असेल तरी त्याला सरकार पाठिशी घालणार नाही. कामगारांना देणी मिळवून दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी येथे दिली.
एनआरसी संघर्ष समितीच्या वतीने कंपनीसमोरच १५ दिवसांपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. या धरणे आंदोलनास शिंदे यांनी भेट दिली. यावेळी आंदोलन करणाऱ्यांनी अदानींच्या विरोधात घोषणा दिल्या. त्याचबरोबर आमदार, खासदार, पालकमंत्री आणि मुख्यमंत्री शिवसेनेचे असताना आम्हाला न्याय कधी मिळणार, असा संतप्त सवाल उपस्थित केला.
यावेळी शिंदे यांनी मी याप्रकरणी मार्ग काढायला आलो आहे, असे सांगून स्थानिक आमदार विश्वनाथ भोईर यांनी याप्रकरणी काही माहिती दिली होती. कामगारांची देणी किती आहे. कंपनी व्यवस्थापन कोणाचे आहे. न्यायालयात काय दावा आहे, या संबंधित सगळी माहिती असलेल्या व्यक्ती आणि कंपनीचे प्रतिनिधी यांच्यासोबत लवकर मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेतली जाईल. एनआरसी कामगारांच्या थकीत देणी देण्यांप्रकरणी कोणालाही काही चुकीचे करू देणार नाही आणि चुकीचे करणार नाही, अशा विश्वास कामगार वर्गाला शिंदे यांनी यावेळी दिला. कामगारांना त्यांचा मोबदला मिळालाच पाहिजे. मग कोणी कितीही मोठा माणूस असला तरी त्याला सरकार पाठिशी घालणार नाही, असे शिंदे यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या बोलण्याचा रोख अदानी यांच्या दिशेने होता.
पोलिसांनी बेकायदेशीर कारवाई करू नये
एनआरसी वसाहतीतील घरे पाडण्याच्या कारवाईस महिलांनी जेव्हा विरोध केला तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावर हात उगारला. ही माहिती महिलांनी यावेळी पालकमंत्र्यांना दिली. त्यावर त्यांनी जे काही कायदेशीर आहे. त्या बाजूनेच पोलिसांनी काम करावे, कोणतीही बेकायदेशीर कारवाई पोलिसांनी करू नये, असे त्यांनी सांगितले.
-----------------