कुणा न माहीत सजा किती ते...त्यांचे जग हेच बंदिशाला ठाणे मध्यवर्ती कारागृहातील १५० कैदी जामिनाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:40 AM2021-08-15T04:40:31+5:302021-08-15T04:40:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : धनाजी जावळे (नाव बदलले आहे) याच्यावर त्याच्या मुलीने लैंगिक शोषणाचा आरोप लावला. मुलीचे एका ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : धनाजी जावळे (नाव बदलले आहे) याच्यावर त्याच्या मुलीने लैंगिक शोषणाचा आरोप लावला. मुलीचे एका तरुणासोबत अनैतिक संबंध होते. त्याला धनाजीने विरोध केल्याने त्या मुलाच्या मदतीने मुलीने लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केल्याने धनाजी उद्ध्वस्त झाला. आता त्याला कोर्टातून जामीन मंजूर होऊ शकतो. परंतु जामिनाची रक्कम भरण्याची ना त्याची ऐपत आहे, ना त्याच्या घरातील कुणी त्याला जामीन द्यायला तयार आहे. त्यामुळे धनाजी विनाकारण ठाणे कारागृहाच्या उंचच उंच भिंतीआड खितपत पडला आहे. इस्माईल अन्सारी (नाव बदलले आहे) हा छोट्या चोरीच्या गुन्ह्यात तुरुंगात गेला. मात्र तो तुरुंगात असताना त्याच्या कुटुंबाची काय वाताहत झाली तेच त्याला ठाऊक नसल्याने त्याचा जामीन कोण देणार? हे व असे किमान १५० कैदी स्वातंत्र्याचे, मुक्त जीवनाचे स्वप्न उराशी बाळगून तुरुंगाच्या पोलादी भिंतीपलीकडे बंद आहेत.
सारा देश स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्याकरिता सिद्ध होत असताना ठाणे तुरुंगातच नव्हे तर देशभरातील वेगवेगळ्या तुरुंगात असे कैदी खितपत पडलेले आहेत. ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात विविध गुन्ह्यांमध्ये शिक्षा झालेले तीन हजार ४८० कैदी आहेत. यापैकी शिक्षा सुनावल्या गेलेल्या केवळ १४० कैद्यांचा समावेश आहे. याखेरीज गंभीर गुन्ह्यातील ७५ महिला व दोन हजार १९० पुरुष हे न्यायालयीन कोठडीत आहेत. या कैद्यांपैकी किमान १५० कैदी असे आहेत की, ज्यांना जामीन मिळणे शक्य आहे. त्यामध्ये चोरी, घरफोडी, विनयभंग, सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे, सरकारी कामात अडथळा आणणे यासारख्या तुलनेने किरकोळ गुन्ह्यांपासून बलात्कार व पोक्सो कायद्याखाली अटकेत असलेल्या कैद्यांचा समावेश आहे. या दीडेकशे कैद्यांची आर्थिक स्थिती अत्यंत खराब आहे. शिवाय काहींशी नातलग, मित्रांनी संबंध पूर्णपणे तोडले आहेत. त्यामुळे काहींनी जामिनाकरिता अर्ज केलेले नाहीत किंवा काहींनी अर्ज केले तरी वकिलाची फी, जामिनाची रक्कम याची तजवीज करू शकलेले नाहीत. त्यापैकी काही कैदी पाच वर्षांपासून अधिक काळ तुुरुंगात खितपत पडले आहेत. काहींना तुरुंग हेच घर वाटू लागले आहे. येथे निदान दोन वेळच्या हक्काच्या जेवणाची सोय आहे. बाहेर गेलो तर गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे कुणी काम देणार नाही. नातलग घरात घेणार नाहीत. त्यामुळे बाहेर भुकेकंगाल मरण्यापेक्षा जेलमध्ये आयुष्य काढणे हाच मार्ग बरा आहे, असे एक कैदी सांगतो. मात्र अन्य एकाला बाहेरच्या खुल्या हवेची, स्वच्छंद पक्ष्यांना भरारी घेताना पाहण्याची, वाहत्या पाण्यात सूर मारण्याची तीव्र इच्छा आहे. परंतु गुन्हेगारीचा शिक्का लागल्याने तो एकाकी पडलाय. त्याच्याकडे जामिनाकरिता पैसा नाही. जेल हे काही घर नाही. तुरुंग हा स्वातंत्र्याच्या विरुद्ध अर्थाचा शब्द आहे. अनेकांना यातून बाहेर पडायचे आहे, असे तो म्हणाला.
तुरुंग प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले की, अशा गरीब व जामिनास पात्र कैद्यांच्या सुटकेकरिता सामाजिक संस्थांनी पुढे यायला हवे. अपवादात्मक परिस्थितीत एखाद्यालाच ते भाग्य लाभते. बाकी जेल हेच जीवन मानतात.
...........
वाचली