कोणी अधिकारी माझे ऐकतच नाही, आरोग्य सभापतींचे हताश उद्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 12:07 AM2019-03-05T00:07:43+5:302019-03-05T00:07:47+5:30
किन्हवली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत मोडकळीस आली असून त्या इमारतीत माझे वडील काम करत आहेत, त्यांच्यासह तेथे काम करणाऱ्यांचा जीव गेल्यास कोण जबाबदार, असा सवाल शिवसेनेच्या सदस्या कांचन बांगर यांना गुरुवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत केला.
ठाणे : किन्हवली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत मोडकळीस आली असून त्या इमारतीत माझे वडील काम करत आहेत, त्यांच्यासह तेथे काम करणाऱ्यांचा जीव गेल्यास कोण जबाबदार, असा सवाल शिवसेनेच्या सदस्या कांचन बांगर यांना गुरुवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत केला. त्याला उत्तर देताना, जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम समितीचे सभापती सुरेश ऊर्फबाळ्यामामा म्हात्रे यांनी माझे कोणी ऐकतच नाही, असे उत्तर दिल्याने सत्ताधारी सदस्यांमध्ये प्रशासनाविषयी तीव्र नाराजीचा सूर उमटला.
जिल्हा परिषदेवर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. या अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभेत किन्हवली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत मोडकळीस आली आहे. त्याच्या तातडीने दुरु स्तीसाठी सहा महिन्यांपासून सदस्या बांगर प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांना दाद दिली जात नाही.
याबाबत विचारणा करून त्यांनी मोबाइलमध्ये काढलेले फोटो अध्यक्षा मंजूषा जाधव, उपाध्यक्ष सुभाष पवार, आरोग्य व बांधकाम स्ािमतीचे सभापती सुरेश म्हात्रे, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्या निदर्शनास आणून तीव्र संताप व्यक्त केला. त्यावेळी सभापती म्हात्रे यांनीही हताश होऊन माझे कोणी अधिकारी ऐकतच नाहीत, असे उद्गार काढले. किन्हवली येथील केंद्राबाबत मी आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. ते लक्ष देत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
कल्याण तालुक्यातील म्हारळ येथील दलितवस्ती सुधारणा योजनेत झालेल्या रस्त्याच्या कामाबाबतही सर्वसाधारण सभेत जोरदार चर्चा झाली. त्यावेळी भाजपाच्या सदस्या वृषाली शेवाळे यांनी बांधकाम विभागातील सावळागोंधळ उघड केला.
रस्त्यात भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाल्यानंतरही, कंत्राटदार व बड्या माशांना सावरण्यात येत असल्याचा आरोप शेवाळे यांनी केला. त्यावरही सभापती म्हात्रे यांनी आरोपांचा चेंडू अधिकाऱ्यांच्या कोर्टात टोलावला. दरम्यान, सभेतच सदस्यांमध्ये याबाबत कुजबूज सुरू झाल्यानंतर थोड्या वेळाने म्हात्रे यांनी सभागृहातून काढता पाय घेतला.
।सीडीचे उद्घाटन
गुड्डा-गुड्डी बोर्डचे आणि माझी कन्या भाग्यश्री या योजनेच्या सीडीचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्षा मंजूषा जाधव यांच्या हस्ते उपाध्यक्ष सुभाष पवार आणि झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच.एस. सोनावणे यांच्या उपस्थित झाले.