शिवकालीन शस्त्रांचा फारसा कोणी अभ्यास केलेला नाही-आप्पा परब
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2018 06:26 PM2018-01-20T18:26:37+5:302018-01-20T18:27:39+5:30
शिवकाळातील शस्त्राचा फारसा कोणी अभ्यास केला नाही. बहुतेक जण प्रचलित मार्गावरून गेले तरी एकाने कोणी तरी हे व्रत घेतले पाहिजे.
डोंबिवली- शिवकाळातील शस्त्राचा फारसा कोणी अभ्यास केला नाही. बहुतेक जण प्रचलित मार्गावरून गेले तरी एकाने कोणी तरी हे व्रत घेतले पाहिजे. ज्यामुळे आपल्याला इतिहास समजेल. शिवरायांनी गानिमी कावा, कोट हल्ला या तंज्ञाचा वापर करून सर्व युध्द जिंकली आहेत, असे मत इतिहासप्रेमी आप्पा (बाळकृष्ण)परब यांनी व्यक्त केले.
ट्रेक क्षितीज संस्था (डोंबिवली) यांच्यातर्फे इतिहासप्रेमींसाठी नवीन वर्षात व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प आप्पा परब यांच्या ‘युध्दनिती शिवाजी महाराजांची’ या व्याख्यानाने गुंफण्यात आली. यावेळी परब बोलत होते. वक्रतुंड सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
परब म्हणाले, जगावे कसे हे शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकविले आहे. कसे मरावे हे संभाजी राजांनी शिकविले. उत्तरेतून आलेले वादळ कसे रोखावे हे राजाराम महाराजांनी शिकविले.तर अटके पार झेंडे लावायला शाहू महाराजांनी शिकविले. अश्या चार ही महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ले रायगड आमच्या गडदुर्गच्या वारक-यांना तीर्थ क्षेत्रासारखा आहे. युध्द ही वसुंधेराला मिळालेली देणगी आहे. युध्द म्हणजे संघर्ष आहे.
राष्ट्राच्या सीमेवर, उंबराच्या आत, बाहेर, बाजूच्या प्रातांत, बाजारात सगळीकडे संघर्ष आहे. या सगळ््या लढाईचा अभ्यास मी करायला घेतला पण तो मी पूर्ण करू शकला नाही. आपल्या देशाच्या, धर्माच्या बाबतीत आचरण आहे त्याला धर्म म्हणतात. युध्दाचा अभ्यास आजही होणे गरजेचे आहे. याचा अंर्तमुख होऊन अभ्यास होण्याची गरज आहे. लढाईचे ८५ प्रकार आहेत ते आपल्याला जगायला शिकवितात. पण त्याकडे अंर्तमुख होऊन पाहण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.
शालेय जीवनात जो इतिहास शिकविला जातो तो केवळ मार्क्स मिळविण्यासाठी असतो. बाह्यजीवनातील इतिहास नाटक, कांदबरी, सिनेमामधील तो मनोरंजक आहे. त्या घडलेल्या इतिहासाला तुम्ही भूगोल जोडता तेव्हा तो बोलायला लागतो. त्यांच्या पुढचा टप्पा हा विज्ञान आहे. पायथळीच्या दगडापासून ते आकाशातील ग्रह-ताºयापर्यंतचा महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास करणारी मुले आहेत. या अभ्यासात ६५ विषय आहेत ते विज्ञानाशी संबधित आहेत. ते आपण अभ्यासले पाहिजे. ते विषय मूर्तीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, वास्तूशास्त्र असेल.
हिंदुस्थानातील सर्व प्रातांना केवळ भूगोल आहे. काही प्रातांना इतिहास आहे. पण तो आपल्या आई-बहिणींनी दिला आहे. महाराष्ट्राला केवळ इतिहास आहे. तो ही अभिमानाचा आहे. त्यापैकी एक विषय म्हणजे युध्द आहे. युध्द ही ईश्वरीने दिलेली देणगी आहे. युध्दामुळे आईवडिलांचा, धर्माचा , प्रातांचा, देशाचा उध्दार होतो. छत्रपतीना अपेक्षित असलेल्या महाराष्ट्रात सुमारे ५ हजार किल्ले आहेत. ते नाहीसे होत आहे. पण अजून ही महाराष्ट्राला जाग आली नाही. जो महाराष्ट्र यादवांचा, कदंबाचा देवगिरीचा, विजयनगर साम्राज्यांचा होता. त्या अभ्यासाकडे आपण बघत नाही. पाश्चात्यांनी येऊन आपला इतिहास शोधावा ही आपली अपेक्षा आहे का? असा सवाल ही त्यांनी केला.