रिपाइंचे नेते आठवले यांचा फोटो नाही, मतदान नाही - भगवान भालेराव
By सदानंद नाईक | Published: June 22, 2024 04:18 PM2024-06-22T16:18:09+5:302024-06-22T16:38:47+5:30
कोकण पदवीधर निवडणुकीत महायुतीकडून भाजपाचे निरंजन डावखरे रिंगणात उतरले आहेत. महायुती सोबत रिपाइं आठवले गटाची युती असून रामदास आठवले हे केंद्रात केंद्रीयमंत्री आहेत.
उल्हासनगर : महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात रिपाइंचे नेते रामदास आठवले यांचा कोणताही उल्लेख नाही. असा आरोप रिपाइंचे शहरजिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांनी करून डावखरे यांना मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोकण पदवीधर निवडणुकीत महायुतीकडून भाजपाचे निरंजन डावखरे रिंगणात उतरले आहेत. महायुती सोबत रिपाइं आठवले गटाची युती असून रामदास आठवले हे केंद्रात केंद्रीयमंत्री आहेत. लोकसभा निवडणुकीत आठवले यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केला. कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत महायुतीकडून भाजपचे निरंजन डावखरे हे उमेदवार असून डावखरे यांनी रिपाइंचे नेते रामदास आठवले यांचे नाव पोस्टर्स, बॅनर्स व जाहीरनाम्यातून डावलले आहे. असा आरोप पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष व माजी उपमहापौर भगवान भालेराव यांनी करून डावखरे यांना मतदान न करण्याचे आवाहन आंबेडकरी समाजाला केले.
गेल्या १२ वर्षात डावखरे यांनी पदवीधर नागरिकांना न्याय दिला नसून महायुतीच्या कोणत्याही बैठकीचे आमंत्रण दिले नाही. असी नाराजी भालेराव यांनी व्यक्त केली. मतदारसंघात एकून २ लाख २२ हजार पदवीधर मतदार असून त्यामध्ये २५ ते ३० टक्के मतदार अनुसुचित जाती व अनुसुचित जमातीचे पदवीधर आहेत. आणि हेच मते निर्णायक असल्याचेही म्हटले आहे. भालेराव यांच्या भूमिकेमुळे भाजपात खळबळ उडाली असून त्यांची समजूत काढण्याचे काम भाजपचे वरिष्ठ नेते करीत आहेत.