नो प्लास्टिकचा संदेश देणारे पोस्टर्स वाटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 06:43 AM2018-04-05T06:43:32+5:302018-04-05T06:43:32+5:30
सरकारने राज्यात प्लास्टिकबंदी घोषित केल्यानंतर पिशव्यांसह इतर प्लास्टिक उत्पादन आणि वापरावर बंदी घातली आहे. या बंदीची जनजागृती करण्यासाठी डॉ. बेडेकर शुश्रूषालय आणि स्वत्व या संस्था ‘नो प्लास्टिक’चा संदेश देणारे पोस्टर्स ठाणेकरांना मोफत देणार आहेत.
ठाणे - सरकारने राज्यात प्लास्टिकबंदी घोषित केल्यानंतर पिशव्यांसह इतर प्लास्टिक उत्पादन आणि वापरावर बंदी घातली आहे. या बंदीची जनजागृती करण्यासाठी डॉ. बेडेकर शुश्रूषालय आणि स्वत्व या संस्था ‘नो प्लास्टिक’चा संदेश देणारे पोस्टर्स ठाणेकरांना मोफत देणार आहेत.
जोपर्यंत नागरिक उत्स्फूर्तपणे यात सहभागी होत नाहीत, तोवर कोणताही समाजाभिमुख उपक्र म यशस्वी होऊ शकत नाही, हा विचार समोर ठेवून डॉ. बेडेकर शुश्रूषालय आणि स्वत्व यांनी प्लास्टिकबंदीविषयी जनजागृती करणारी पोस्टर्स बनवली आहेत. ती जागरूक आणि जबाबदार नागरिकांसाठी विनामूल्य दिली जाणार आहेत. ती गृहसंकुले, कार्यालये आणि आपल्या परिसरातील लहानमोठी दुकाने अशा ठिकाणी लावू शकता, असे आवाहन डॉ. बेडेकर रुग्णालय आणि स्वत्वने ठाणेकरांना केले आहे. स्वत्वच्या कलाकारांनी ही पोस्टर्स तयार केली असून ती डॉ. बेडेकर रुग्णालयात उपलब्ध आहेत. ज्यांना इथे येऊन हे पोस्टर्स घेणे शक्य नाही, त्यांनी mahesh_bedekar@yahoo.com, projectswatva@gmail.com या ई-पत्त्यावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. या पोस्टर्समध्ये मुलगी वडिलांना आणि मुलगा आईला प्लास्टिक वापरू नका, असे सांगत असल्याचे दाखवले आहे. बंदी जाहीर झाल्यापासून आम्ही या उपक्रमासंदर्भात विचार करत होतो. गेल्या दोनतीन दिवसांपासून स्वत्वचे कलाकार हे पोस्टर्स बनवण्याचे काम करत आहेत.
आतापर्यंत एक हजार पोस्टर्स मराठी आणि इंग्रजी भाषेत तयार केली आहेत. आणखी बनवली जातील, असे स्वत्वच्या संस्थापिका अॅड. स्वाती दीक्षित यांनी सांगितले.
सरकारने बंदी आणल्यानंतरही प्लास्टिक पिशव्यांचा वापर सर्रास होत आहे. त्यामुळे जनजागृती करणारे पोस्टर्स बनवावे, ही संकल्पना सुचली. यासाठी श्रीपाद भालेराव यांना फोन करून त्यांच्याकडून ती तयार करून घेतली. नुसती बंदी आणून चालत नाही, त्यात लोकसहभाग महत्त्वाचा असतो, म्हणूनच स्वत्व आणि बेडेकर रुग्णालयाच्या वतीने ठाणेकरांना मोफत पोस्टर्स वाटले जाणार आहेत. पालकांना त्यांचे महत्त्व पटले, तर त्यांची जबाबदारी वाढून त्यांच्या पाल्यांचेही प्रबोधन होईल. हे पोस्टर्स प्रथम गावदेवी भाजी मंडईत लावले जाणार आहेत.
- डॉ. महेश बेडेकर, डॉ. बेडेकर शुश्रूषालय
सध्या आम्ही नो प्लास्टिक ही मोहीम हाती घेतली आहे. नंतरच्या टप्प्यात पर्यायाचा विचार केला जाईल.
- अॅड. स्वाती दीक्षित, संस्थापिका, स्वत्व