नांदेडमधील मृत्यूंचे राजकारण नको : सामंत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 03:39 PM2023-10-10T15:39:12+5:302023-10-10T15:39:47+5:30
येत्या दोन ते तीन दिवसांत राज्यातील प्रत्येक विभागात गेल्या एक वर्षात झालेल्या चांगल्या कामाची माहिती पत्रकार परिषद घेऊन मांडणार आहोत, असेही सामंत यांनी सांगितले.
ठाणे : नांदेड घटनेचे आम्ही समर्थन करत नाही. या घटनेप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मात्र नांदेड रुग्ण मृत्यू प्रकरणावर विरोधक राजकारण करत आहेत, अशी टीका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी ठाण्यात केली.
नांदेड घटनेची पुनरावृत्ती होणार नाही. यासाठी विरोधकांच्या काही सूचना असतील तर त्यांनी त्या द्याव्यात, असेही सामंत म्हणाले. एखादी घटना घडल्यानंतर राजकीय वळण देऊन बदनामी करणे योग्य नाही. आरोग्य व्यवस्थेत त्रुटी दिसत असतील तर पत्रकार परिषद घेऊन टीका करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी, असे आवाहनही त्यांनी विरोधी पक्षाला केले.
- येत्या दोन ते तीन दिवसांत राज्यातील प्रत्येक विभागात गेल्या एक वर्षात झालेल्या चांगल्या कामाची माहिती पत्रकार परिषद घेऊन मांडणार आहोत, असेही सामंत यांनी सांगितले.
कोरोनाकाळात देशभरातील एकूण मृतांपैकी सुमारे ३० टक्के मृत्यू महाराष्ट्रात झाले होते. काही संस्थांनी तयार केलेल्या अहवालात महाराष्ट्र सरकारचे कोरोनाकाळातील आरोग्य व्यवस्थापन कमी पडले, असे ते म्हणाले.
आमदार मनीषा कायंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात जाण्यासंदर्भात एक वक्तव्य केले होते. केंद्रात राहायचे की राज्यात याबाबतचे हे सल्ले आम्ही देणार नाही, असेही त्यांनी सांगितले.