केडीएमसीच्या लस खरेदीच्या निविदेला प्रतिसाद नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:26 AM2021-06-19T04:26:42+5:302021-06-19T04:26:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : केडीएमसीने कोरोना प्रतिबंधक लसीकरण वेगाने करण्याकरिता लसीचे दोन लाख डोस खरेदीसाठी काढलेल्या निविदेला अद्याप ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : केडीएमसीने कोरोना प्रतिबंधक लसीकरण वेगाने करण्याकरिता लसीचे दोन लाख डोस खरेदीसाठी काढलेल्या निविदेला अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे मनपाला फेरनिविदा काढावी लागणार आहे. या सगळ्या प्रक्रियेत वेळ खर्ची होणार असल्याचे बोलले जात आहे.
मनपाने दोन लाख लसींचे डोस खरेदी करण्यासाठी जवळपास आठ कोटी रुपये खर्चाची राष्ट्रीय स्तरावरील निविदा मागविली होती. लस तयार करणाऱ्या भारतीय कंपन्याकडून या निविदेला प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे मनपाने जागतिक निविदा काढणे आवश्यक होते, असे आता बोलले जात आहे. निविदा प्रक्रिया राबविण्यात महिनाभराचा कालावधी गेला आहे. आणखी महिनाभरात प्रतिसाद मिळतो की नाही, हे ठरणार आहे. केडीएमसीच्या मते अन्य मनपांनी काढलेल्या निविदांनाही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे केडीएमसी त्याला अपवाद नाही. आता नव्याने निविदा काढली जाणार आहे.
केडीएमसी हद्दीतील २७ गावे पकडून जवळपास १५ लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या आहे. त्यापैकी १३ लाख ५९ हजार नागरिकांचे लसीकरण करण्याचे मनपाचे उद्दिष्ट आहे. जानेवारीपासून आतापर्यंत केवळ दोन लाख १५ हजार नागरिकांना लसीचा पहिला डोस, तर ५१ हजार नागरिकांना दुसरा डोस दिला आहे. त्यामुळे लसीकरण वाढविण्याची गरज आहे. केडीएमसीला राज्य सरकारकडून पुरेसे डोस उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे मनपाने बऱ्याच मोठ्या प्रमाणात लसीचे डोस राज्य सरकारकडे मागितले आहेत. मनपाकडून सध्या २१ लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. मात्र, लसीचे डोस पुरेसे मिळत नसल्याने अनेकदा लसीकरण स्थगित ठेवण्याची वेळ प्रशासनावर येते.
केडीएमसीने दोन लाख लस खरेदी केल्या असत्या तर जास्तीतजास्त केंद्रांवर लस देता आली असती. मनपाच्या आरोग्य विभागाची १० प्रभागांमध्ये लसीकरण केंद्रे सुरू करण्याची तयारी आहे. राज्य सरकारकडून एकाच वेळी १० लाख लसीचे डोस मिळाल्यास दिवसाला ४० हजार लसींचे डोस १०० लसीकरण केंद्रांतून देता येणे शक्य आहे. मात्र, सरकारकडून पुरेसे डोस उपलब्ध होत नाहीत. दुसरीकडे लस खरेदीच्या निविदेला प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे मनपाची एक प्रकारे कोंडी झाली आहे.
एकाच सोसायटीमध्ये सशुल्क लसीकरण
मनपाने गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये तसेच ३३ खासगी रुग्णालयांना सशुल्क लसीकरण सुरू करण्यास मान्यता दिली आहे. या धोरणानुसार केवळ कासाबेला या उच्चभ्रु सोसायटीने रिलायन्स रुग्णालयाच्या मदतीने सोसायटीतील सहा हजार नागरिकांचे सशुल्क लसीकरण करण्यास सुरुवात केली आहे.
---------