"रेल्वे ट्रॅकजवळील एकाही झोपडपट्टीधारकावर अन्याय होणार नाही, रहिवाशांचे पुनर्वसन केले जाईल"
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 05:43 PM2022-02-18T17:43:47+5:302022-02-18T17:46:04+5:30
Ashwini Vaishnaw : अश्विनी वैष्णव हे शुक्रवारी ठाण्यात ठाणे ते दिवा या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे लोकार्पण करण्यासाठी आले होते.
ठाणे - रेल्वे ट्रॅकच्या कडेला असलेल्या झोपडपटीवासियांमध्ये काहीजण भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आपल्याला आदर करावा लागणार आहे. परंतु राज्य शासनाचे काम असते पुनर्वसनाचे असते, त्यानुसार राज्य शासन आणि रेल्वे यांच्यात समन्वय साधून येथील रहिवाशांचे योग्य ते पुनर्वसन केले जाईल असे आश्वासन केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले.
वैष्णव हे शुक्रवारी ठाण्यात ठाणे ते दिवा या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे लोकार्पण करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात हजेरी लावली. यावेळी भाजपाचे सर्व नगरसेवक त्याठिकाणी उपस्थित होते. यावेळी त्यांनी प्रत्येक नगरसेवकाची हजेरी घेतली. तसेच आगामी निवडणुकीच्या दृष्टीने त्यांनी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिले. दरम्यान यावेळी आगामी निवडणुकीत काही जण एसी रेल्वेच्या भाडय़ाचा मुद्दा लावून धरतील. मात्र त्यांना खडसावून सांगा की याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चा करीत असून एसी रेल्वेचे भाडे माफक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार भाडे कमीच असेल असे सर्वाना सांगा.
रेल्वे ट्रॅकच्या कडेला असलेल्या झोपडय़ा हटविण्याचे आदेश सर्वोच्य न्यायालयाने दिलेले आहेत. त्यानुसार त्यांचा सन्मान राखला पाहिजे. मात्र या मुद्यावरुनही काही जण तुमच्या मनात भ्रम निर्माण करू शकतात. परंतु त्यांना सांगा रेल्वे यावर तोडगा काढत आहे. बाधीत होणाऱ्यांसाठी राज्य शासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्यानुसार राज्य शासन आमि रेल्वे यांच्यात समन्वय साधून एकाही झोडपट्टीधारकाला बेघर होऊ देणार नसून यावर लवकरच तोडगा काढला जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ठाणे स्टेशन ऐतिहासिक स्थानक आहे याठिकाणाहून पहिली ट्रेन धावली होती, त्यामुळे हे स्थानक ऐतिहासिक असून त्याचा हेरीटेज दर्जा राखण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी आदेश दिले आहेत. तसेच याचा विकासही वर्ल्र्ड क्लास करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत.
येत्या काळात ठाणे स्थानकाचा विकास केला जाणार असून याचे श्रेय ठाणे शहर भाजपचेच आहे, त्यामुळे हे श्रेय तुम्हीच घ्या, ठाणेकरांना आणि इतरांनाही सांगा, शिवाय या स्थानकाचा कायापलाट करण्यासाठी तुमच्या काही सुचना असतील, काही बदल करायचे सांगायचे असतील तर तशा सुचना जरुर कळावा असेही त्यांनी सांगितले. एकूणच मागील काही दिवसांपासून झोडपट्टींचा विषय असेल, एसी रेल्वेच्या भाडय़ाचा विषय असेल किंवा ठाणो स्थानकाचा विकास असेल या सर्वच मुद्यांना रेल्वे मंत्र्यांनी हात घालून एक प्रकारे आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकत याचे श्रेय भाजपवाल्यांचेच असल्याचे स्पष्ट केले आहे.