स्थगिती नसल्याने घरे लवकर द्या, फडणवीसांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 12:31 AM2020-03-02T00:31:06+5:302020-03-02T00:31:16+5:30
भिवंडी रोडवर एक लाख घरांचा प्रकल्प असून, वसई-विरार परिसरांतील अनेक प्रकल्पांद्वारे सामान्य माणसाला घर मिळणे शक्य आहे.
ठाणे : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ठाणे परिसरासह भिवंडी रोडवर एक लाख घरांचा प्रकल्प असून, वसई-विरार परिसरांतील अनेक प्रकल्पांद्वारे सामान्य माणसाला घर मिळणे शक्य आहे. या योजनेला सरकारने स्थगिती दिली नसल्याचा टोला मारत, या प्रस्तावांवर सरकारने लवकर निर्णय घेतल्यास, या घरांचा लोकांना मोठ्या प्रमाणात लाभ घेता येईल, असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे सांगितले.
येथील राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये दी ठाणे डिस्ट्रीक्ट को-आॅपरेटिव्ह हाउसिंग फेडरेशनतर्फे गृहनिर्माण संस्थांसाठी मार्गदर्शन मेळावा रविवारी घेण्यात आला. यासाठी फडणवीस ठाण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर खासदार विनय सहस्रबुद्धे, आमदार संजय केळकर, भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार निरंजन डावखरे आणि फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे आदी उपस्थित होते. यावेळी फडणवीस म्हणाले की, ठाण्याची लोकसंख्या वाढत आहे. त्यासाठी क्लस्टर योजनेचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आवास योजनेच्या लाभासाठी ठाणे जिल्ह्यातून एक लाख घरांचे प्रस्ताव आले. त्यासाठी ठाणे, भिवंडी रोडवरील प्रकल्पासह वसई-विरार परिसरातील अनेक प्रकल्पांवर शासनाने लवकरच निर्णय घेण्याची गरज असल्याचे फडणवीस म्हणाले.
>वरच्या मजल्याची आशा नाही : नवीन सरकारमधील वरचा मजला मलाच पाहिजे, असे प्रकार सुरू असल्याचा मुद्दा खा. सहस्रबुद्धे यांनी मांडला. त्यावर फडणवीस म्हणाले की, कुठला मजला कोणी घेतला, याची मला चिंता नाही. वरचा मजला मला कधी मिळेल, याची आशा मला नाही. आपल्याला त्याची काळजी करण्याचे कारण नाही. आपण जनतेच्या कोर्टात जाणारे लोक आहोत. जनतेचे वकील म्हणून त्यांच्या समस्या ताकदीने सरकारपुढे मांडून त्यांचे निराकरण करू, असे त्यांनी यावेळी सत्तेविषयी बोलताना स्पष्ट केले.
>महाविकास आघाडीवर सहस्रबुद्धेंनी केली टीका
सत्तास्थापनेसाठी झालेल्या नवीन राजकीय समीकरणांचा संदर्भ गृह प्रकल्पांशी जोडत, सहस्रबुद्धे आडवळणाने म्हणाले की, जनादेशाच्या जमिनीवरील इमारतीत दुसराच कुणीतरी घुसतो. ती इमारत बळकावतो. वैचारिकतेचा विचार न करता इमारत चकचकीत असल्याचे केवळ भासवले जात आहे. म्हणूनच, अवघ्या तीनचार महिन्यांत या भुसभुशीत जमिनीवरील इमारत खिळखिळी झाली आहे. ज्या जनादेशाची जमीन आहे, त्या मूळ मालकाला ती मिळावी. तसा संपूर्ण पुनर्विकास राजकारणातही व्हावा, ही जनतेची इच्छा असल्याचे सांगून, त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. ट्रक वाहतुकीमुळे ठाणे जिल्ह्यात होत असलेली वाहतूककोंडी दूर करण्यासाठी रेल्वे व जेएनपीटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या जात असल्याचे सहस्रबुद्धे यांनी यावेळी स्पष्ट केले.