ठाणे जिल्ह्यात तूर्तास ऑक्सिजनसाठी नो टेन्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:41 AM2021-04-09T04:41:49+5:302021-04-09T04:41:49+5:30

ठाणे : राज्यात अनेक ठिकाणी लसीकरणाचा तुटवडा निर्माण झाला आहे. ठाणे जिल्ह्यातही अशीच परिस्थिती असून रेमेडिसीवर इंजेक्शनसुद्धा मिळणे ...

No tension for oxygen in Thane district | ठाणे जिल्ह्यात तूर्तास ऑक्सिजनसाठी नो टेन्शन

ठाणे जिल्ह्यात तूर्तास ऑक्सिजनसाठी नो टेन्शन

googlenewsNext

ठाणे : राज्यात अनेक ठिकाणी लसीकरणाचा तुटवडा निर्माण झाला आहे. ठाणे जिल्ह्यातही अशीच परिस्थिती असून रेमेडिसीवर इंजेक्शनसुद्धा मिळणे कठीण झाले आहे. परंतु, दुसरीकडे जिल्ह्यासाठी समाधानाची बाब समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यात ऑक्सिजनचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून जिल्ह्यात पाच शासकीय रुग्णालयांमध्ये लिक्विड ऑक्सिजन टाकी बसविण्यात आल्याने सध्याच्या घडीला ड्युरा, जम्बो आणि छोटे ऑक्सिजन टाक्या सज्ज ठेवल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कुठल्याही शासकीय रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता पडणार नसल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात तूर्तास तरी ऑक्सिजनसाठी नो टेन्शन असेच चित्र दिसत आहे.

ठाणे जिल्ह्यात मागील वर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाने शिरकाव केला. यावेळी कमी प्रमाणात असलेल्या बाधित रुग्णांच्या संख्येत एप्रिल, मे, जून आणि जुलै महिन्यात दिवसागणिक वाढत गेली. त्यामुळे जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्येदेखील बेड्स उपलब्ध होत नसल्याच्या, रुग्णवाहिका मिळत नसल्याच्या तक्रारी रुग्णांकडून करण्यात येत होत्या. त्यात अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे ऑक्सिजन अभावीदेखील कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे ऑक्सिजनअभावी होणारे मृत्यू टाळण्यासाठी शासनाच्यावतीने ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात १० किलो लीटरची एक टाकी, शहापूर उपजिल्हा रुग्णालय, उल्हासनगर ४ येथील शासकीय मॅटर्निटी होम आणि हॉस्पिटल, मध्यवर्ती जिल्हा रुग्णालय, भिवंडी येथील कोविड केअर सेंटर आणि डेडिकेटेड कोविड सेंटर या ठिकाणी प्रत्येकी एक ६ किलो लीटरची टाकी बसविल्या आहेत.

दरम्यान, मागील तीन ते चार महिन्यांपासून आटोक्यात आलेल्या कोरोना या आजाराने मार्च महिन्यापासून सर्वत्र हाहाकार उडवून दिला आहे. त्यातही मागील वर्षीच्या तुलनेत सध्या रुग्णांची संख्या कित्येक पटीने वाढताना दिसत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लसींपाठोपाठ ऑक्सिजनचादेखील तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये प्रशासन द्विधा संकटात सापडले आहे. अशातच ठाणे जिल्ह्यात अतिरिक्त ऑक्सिजनचा साठा उपलब्ध असून ऑक्सिजनची चिंता नसल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. सध्याच्या घडीला जिल्ह्यातील पाच शासकीय रुग्णालयांमध्ये लिक्विड ऑक्सिजन टाकी बसविली आहे. तर, २४ ड्युरा सिलिंडर, ४०० जम्बो आणि ३०० छोटे ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

.....

ठाणे जिल्ह्यातील पाच शासकीय रुग्णालयांमध्ये अद्ययावत पद्धतीच्या लिक्विड ऑक्सिजन टाकी बसविण्यात आल्या आहेत. तसेच ड्युरा, जम्बो आणि छोटे ऑक्सिजन सिलिंडरचा अतिरिक्त साठा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांसाठी उपलब्ध आहे. तसेच कोविड रुग्णांना लागणारे औषधेदेखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे रुग्णांना कोणत्याही प्रकारची कुठलीही गैरसोय होणार नाही, याची संपूर्ण काळजी जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून घेण्यात येत आहे.

- डॉ. सुभाष पवार, मुख्य औषध निर्माता, जिल्हा सामान्य रुग्णालय, ठाणे

Web Title: No tension for oxygen in Thane district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.