झाडां ना डांबर , डेब्रिज - सिमेंटचा फास, झाडांचे मोठे नुकसान

By धीरज परब | Published: April 18, 2024 08:16 PM2024-04-18T20:16:19+5:302024-04-18T20:16:57+5:30

हरित लवादच्या आदेशाचे उल्लंघन करून झाडांना नुकसान करणाऱ्या अधिकारी - ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

No trees or asphalt, debris - cement piles, heavy damage to trees | झाडां ना डांबर , डेब्रिज - सिमेंटचा फास, झाडांचे मोठे नुकसान

झाडां ना डांबर , डेब्रिज - सिमेंटचा फास, झाडांचे मोठे नुकसान

मीरारोड - झाडांच्या बुंध्या संबोवताली एक मीटर बाय एक मीटरचे क्षेत्र मोकळे ठेवणे हरित लवादच्या आदेशा नुसार बंधनकारक असताना देखील मीरा भाईंदर मध्ये एमएमआरडीए आणि महापालिका मार्फत रस्ते - नाले बांधकाम करताना झाडांच्या बुंध्या भोवती सर्रास डांबर , डेब्रिस , सिमेंट आदींचा फास आवळला जात आहे . यामुळे झाडांचे मोठे नुकसान होत असून संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासह सेवेतून निलंबित करावे अशी मागणी पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केली आहे . 

मीरा भाईंदर मध्ये सार्वजनिक रस्ते , नाले तसेच अन्य विकासकामे करताना सर्रास लहान - मोठ्या झाडांच्या बुंध्या भोवती डांबरीकरण करणे , काँक्रीटीकरण करणे असले प्रकार सातत्याने केले जातात . झाडांच्या बुंध्या सभोवताली १ मीटर बाय १ मीटर ची जागा मोकळी सोडून त्याला चौकट बांधणे व आतील भागात केवळ माती ठेवणे आवश्यक असते . ज्यामुळे झाडांच्या मुळांना ऑक्सिजन , पाणी मिळते  . 

हरित लवाद ने देखील ह्या बाबत आदेश दिलेले आहेत . परंतु मीरा भाईंदर महापालिकेतील काही मुजोर आणि निगरगट्ट अधिकारी मात्र हरित लवादाच्या आदेशा सह कायदे नियम आदींना न जुमानता झाडांच्या भोवती सर्रास सिमेंट , डांबर , डेब्रिजचा फास आवळत आले आहेत . 

या बाबत वृक्ष प्राधिकरण विभागा कडून महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागास अनेकवेळा पत्र दिली आहेत . परंतु बांधकाम विभाग हा प्रशासनातील बलाढ्य मानला जात असल्याने सदर विभागाचे अधिकारी हे लवाद , वृक्ष प्राधिकरण विभाग यांच्या निर्देशांना जुमानत नाही . 

 त्यातच सध्या शहरात सिमेंट काँक्रीट रस्त्यांची कामे सुरु असून या कामा दरम्यान देखील झाडांच्या सभोवताली मोकळी जागा हरित लवादाच्या आदेशा नुसार सोडलेली नाही व तसे आळे देखील बांधलेले नाहीत . झाडांच्या बुंध्यांना डेब्रिज आणि सिमेंट टाकण्यात आले आहे. नुकतेच घोडबंदर किल्ल्यात देखील सुशोभीकरण कामा दरम्यान झाडांच्या बुंध्यांना चक्क काँक्रीटीकरण करण्यात आले होते . परंतु त्या प्रकरणी देखील अजून संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कारवाई केली गेलेली नाही . 

शहरातील नव्याने सुरु असलेले सिमेंट रस्ते , आधी केलेले डांबरी रस्ते , नाले बांधकाम वा पदपथ बांधकाम दरम्यान ज्या ज्या ठिकाणी झाडांना डांबर - काँक्रीटचा फास घालण्यात आला आहे तो तात्काळ काढून घेण्यात यावा . त्याठिकाणी चौकट बसवून माती टाकण्यात यावी . या प्रकरणात हरित लवादाच्या आदेशाचे उल्लंघन करून झाडांना हानी पोहचवणाऱ्या पालिकेचे आणि एमएमआरडीएचे संबंधित अधिकारी ,. ठेकेदार यांच्यावर नागरी झाडांचे जतन व संवर्धन आदी कायदे नुसार गुन्हा दाखल करावा . त्यांच्या वेतनातून झाडांचे झालेले नुकसान वसूल करावे . त्यांना सेवेतून निलंबित करावे अशी मागणी गो ग्रीन फाऊंडेशन, सत्यकाम फाउंडेशन , जिद्दी मराठा संस्था आदींच्या पदाधिकारी आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केली आहे . 

Web Title: No trees or asphalt, debris - cement piles, heavy damage to trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.