‘शहापूरमधील एकही ग्रामस्थ पाण्यावाचून राहू नये’; ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रशासनाला कानपिचक्या
By सुरेश लोखंडे | Published: April 1, 2024 04:07 PM2024-04-01T16:07:06+5:302024-04-01T16:09:04+5:30
शहापूर पंचायत समिती सभागृहात आढावा बैठक घेऊन प्रशासनाची कानउघडणी केली
सुरेश लोखंडे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: जिल्ह्यातील शहापूर तालुका तीव्र पाणी टंचाईला ताेंड देत आहे. या टंचाईग्रस्त गांवपाड्यांचा आढावा घेण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी रविवारी प्रत्यक्ष शहापूरला खास भेट देऊन प्रशासनाची झाडाझडती घेतली. तालुक्यातील एकही ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यावाचून वंचित राहू नये,अशी दक्षता घेण्यासाठी त्यांनी प्रशासनाला तंबी देऊन चांगलेच धारेवर धरले.
'शहापूर तालुक्यातील २५ गांवपाडे तहानलेली' या मथळ्याखाली लोकमतने ३० मार्च रोजी प्रसिद्ध करून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेत जिल्हाधिकार्यांनी रविवारी शहापूरचा ग्रामीण, दुर्गम भाग गाठला आणि पाणी टंचाईग्रस्त गांवपाड्यांची पहाणी केली. दरम्यान त्यांनी शहापूर पंचायत समिती सभागृहात आढावा बैठक घेऊन प्रशासनाची कान उघडणी केली. यावेळी टँकर ग्रस्त ९१ गाव पाड्याची माहिती उघकीस आली. या समस्यांवर त्वरित उपाययोजना करा, अशा सुचना ही त्यांनी यावेळी दिल्या. ग्रामस्थांच्या जगण्यासाठी पाणी आवश्यक आहे. त्यामुळे कोणताही ग्रामस्थ पाण्यावाचून राहता नये. ज्या गावात पाणी पातळी कमी होऊन पाणी टंचाई आढळून येण्याची शक्यता आहे, त्या गाव पाड्यासाठी पंधरा दिवस आधी प्रस्ताव सादर करा आणि एक दिवस आधीच टॅंकरने पाणी पुरवठा करा,असेही त्यांना यावेळी आदेश दिले.
शहापूर पंचायत समिती सभागृहात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छाया शिसोदे, उपविभागीय अधिकारी भिवंडी अमित सानप, कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ ठाणे तन्मय कांबळे, पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता प्रदीप कुलकर्णी, शहापूर गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे, उप अभियंता विकास जाधव, स्वच्छ भारत मिशनचे एबीडीओ पंडित राठोड आदींसह ग्रामस्थ माेठ्यासंख्येने उपस्थित हाेते. गावातील लोकसंख्या, गावातील हातपंप संख्या, विहीरीची संख्या आणि पाण्याच्या इतर पर्याय तपासून पुढील पंधरा दिवसांत शहापूर तालुक्यातील पाणी पुरवठा संदर्भात नियोजन करण्यात यावे, अशा सुचना जिल्हाधिकार्यांनी दिल्या. शहापूर तालुक्यात स्वच्छता प्रश्न महत्त्वाचा आहे. कचऱ्याची विल्हेवाट वेळोवेळी लावणे गरजेचे आहे. ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करून विल्हेवाट लावण्यासाठी नियोजन करण्यात यावे. कचरा उचलला गेल्यानंतर व आधी असे फोटो काढून फोटो संकलन करण्यात आले पाहिजे. ग्रामसेवकांनी ज्या ठिकाणी ग्रामस्थ किंवा इतर कोणी कचरा टाकत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, असे यावेळी शिसोदे यांनी सांगितले.