ज्येष्ठ नागरिकांना ना पाणी, ना खुर्च्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 12:28 AM2021-03-04T00:28:23+5:302021-03-04T00:28:36+5:30

लसीकरण केंद्रांवर तिसऱ्या दिवशीही गोंधळ कायम : वयोवृद्धांच्या नशिबी गैरसोय कायम

No water, no chairs for senior citizens | ज्येष्ठ नागरिकांना ना पाणी, ना खुर्च्या

ज्येष्ठ नागरिकांना ना पाणी, ना खुर्च्या

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे  : लसीकरणाच्या तिसऱ्या  दिवशीही पालिकेच्या अनेक केंद्रांवर गोंधळ दिसून आला. पोस्ट कोविड सेंटर, बाळकुम येथील कोविड सेंटर, मनोरमानगर, दादोजी कोंडदेव स्टेडिअमजवळील केंद्रासह इतर केंद्रांवर ज्येष्ठांना बसण्यासाठी खुर्च्या नसणे, वारंवार सर्व्हर डाउन होणे, पिण्यास पाणी उपलब्ध नसणे, असा सावळागोंधळ होता. त्यामुळे सलग तिसऱ्या  दिवशी लसीकरणाकरिता आलेल्या ज्येष्ठांना त्रासाला सामोरे जावे लागले.
ठाणे  महापालिका हद्दीत खाजगी रुग्णालयांच्या ठिकाणी अद्यापही लसीकरण सुरू झालेले नाही. मात्र, महापालिकेने शहरातील १५ केंद्रांवर लसीकरण मोहीम सुरू केली आहे. पहिल्या दिवशी या केंद्रांवर फारशी गर्दी नव्हती. मात्र, मंगळवारी दुसऱ्या दिवशी या केंद्रांवर सुमारे एक हजारांच्या आसपास ज्येष्ठांचे लसीकरण झाले. तिसऱ्या दिवशीदेखील अनेक केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांसह दुसरा डोस घेणाऱ्यांनी रांगा लावल्या होत्या. त्यामुळे गोंधळ उडाला होता. पोस्ट कोविड सेंटर येथे वेळेआधीच ज्येष्ठांनी रांग लावली होती. त्यांना बसण्यासाठी खुर्च्या नव्हत्या. त्यामुळे ते ताटकळल्याचे दिसून आले. अर्ध्या तासानंतर ज्येष्ठांना बसण्यासाठी खुर्च्या उपलब्ध करून देण्यात आल्या. सर्व्हर वरचेवर डाउन झाल्याचे दिसून आले. अशीच परिस्थिती दादोजी कोंडदेव येथील केंद्रावर होती. तेथेही ज्येष्ठांना नाना समस्यांना सामोरे जावे लागले. बसण्यासाठी खुर्च्या नसणे, उन्हाच्या झळांचा त्रास सुरू झालेला असताना पिण्यास स्वच्छ पाणी नसणे, या समस्यांमुळे ज्येष्ठांनी तीव्र नाराजी प्रकट केली. या संदर्भात जगदीश खैरालिया यांनी महापौर नरेश म्हस्के यांच्याशी संपर्क साधून तक्रार केल्यावर खुर्च्या आणि पाण्याची व्यवस्था केली गेली. 
मनोरमानगर केंद्रावर सकाळपासून दुपारी २ वाजेपर्यंत सर्व्हर डाउन असल्याने सकाळपासून आलेल्या ज्येष्ठांना मनस्ताप सहन करावा लागला. ॲप वारंवार डाउन होत असल्याने आपला नंबर केव्हा लागणार, अशी विचारणा ज्येष्ठ नागरिकांकडून केली जात होती.

नव्या वर्षात सापडले सर्वाधिक ८१८ रुग्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचे नव्या वर्षातील सर्वाधिक ८१८ रुग्ण  आढळले.  यामुळे जिल्ह्यात आता २ लाख ६७ हजार ९१० रुग्णांची नोंद झाली. दिवसभरात सहा जण दगावल्याने मृतांची संख्या ६ हजार २८६ झाली आहे.   
ठाणे शहर परिसरात २३५ रुग्ण आढळल्याने येथील रुग्णसंख्या आता ६२ हजार ८८८ झाली. शहरात एकाच्या मृत्यूची नोंद झाली असून मृत्यूंची संख्या १ हजार ३९० वर गेली. कल्याण-डोंबिवलीत २४२ रुग्णांची वाढ झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबईत १५३ रुग्णांची वाढ झाली असून मृत्यूसंख्या दोन आहे. उल्हासनगरमध्ये २४ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू झाला नाही. भिवंडीत दोन बाधित असून एकही मृत्यूची नोंद नाही.  मीरा-भाईंदरमध्ये ६९ रुग्ण आढळले. अंबरनाथमध्ये २२ रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. बदलापूरमध्ये ३९ रुग्णांची नोंद झाली असून एकाही मृत्यूची नोंद नाही. ठाणे ग्रामीणमध्ये ३२ रुग्णांची वाढ झाली असून दोन मृत्यू झाले आहेत.

Web Title: No water, no chairs for senior citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.