अख्तरांच्या वक्तव्याचे आश्चर्य वाटत नाही - जितेंद्र आव्हाड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 05:52 AM2021-09-06T05:52:36+5:302021-09-06T05:53:31+5:30
जितेंद्र आव्हाड : डोंबिवलीत ‘राष्ट्रवादी’ च्या कार्यालयाचे उद्घाटन
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : गीतकार, लेखक जावेद अख्तर यांनी एका मुलाखतीत आरएसएस आणि इतर संघटनांची तुलना तालिबानशी केल्याने एकीकडे वादंग उठले आहे. यावर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्येकाला वैचारिक स्वातंत्र्य आहे. त्यामुळे जावेद अख्तर जे बोलले, त्याबाबत काहीही आश्चर्य वाटले नाही. त्या वादात मी पडणार नाही, असे मत डोंबिवली येथे व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूर्वेतील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आव्हाड यांच्या हस्ते झाले. यावेळी पत्रकारांशी ते बाेलत हाेते. त्यांनी राष्ट्रीय मुद्यांसह स्थानिक विषयांवर भाष्य केले. प्रत्येक पक्षाला आपली ताकद आजमावून पाहायची असते. त्याप्रमाणे आज जे चित्र मला दिसत आहे, ते निश्चितच पक्षासाठी उत्साहवर्धक आहे. आर. आर. पाटील यांच्या कालावधीत जो उत्साह होता तो आज दिसत आहे. आयत्या वेळेस घोटाळा नको. त्यामुळे स्वबळाची तयारी सुरू असल्याचे आव्हाड म्हणाले.
खड्ड्यांच्या मुद्यावर ते म्हणाले की, ठाण्यासह सगळीकडेच खड्डे आहेत. कळवा-मुंब्रा येथे कधी काळी सर्वाधिक खड्डे असायचे, पण दहा वर्षांत खड्डे पडलेले नाहीत. त्याठिकाणी येणारे काँक्रिटही मी तपासून टाकतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले. सत्तेचा प्रमुख कोण आहे या प्रश्नावर आव्हाड यांनी महाविकास आघाडीचे सरकार जरी असले तरी सर्वांत जास्त आमदार शिवसेनेचे आहेत. त्यामुळे तेच प्रमुख असल्याचे स्पष्ट केले. माजी खासदार आनंद परांजपे यांनी बीएसयूपी घोटाळा बाहेर काढला होता. मात्र, त्याकडे कुणी लक्ष दिले नाही.
आजही लाभार्थी घरांच्या प्रतीक्षेत असल्याकडे आव्हाड यांनी लक्ष वेधले. यावेळी महेश तपासे, जगन्नाथ शिंदे, प्रमोद हिंदुराव यांसह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, अख्तर यांच्या विधानावरुन उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. यातून आता राजकारणही तापू लागल्याचे देशासह राज्यात दिसून येत आहे.
तिसऱ्या लाटेबाबत बेफिकिरी नकाे!
मुख्यमंत्र्यांनी कोरोनाकाळात जी कामगिरी केली त्याची दखल सगळ्यांनीच घेतली आहे. परदेशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने कहर केला आहे. ही लाट भारतात येण्याची शक्यता आहे. त्या लाटेबाबत बेफिकिरी दाखवू नका, असा सूचक इशारा आव्हाड यांनी यावेळी दिला. दरम्यान, राष्ट्रवादीच्या मेळाव्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गर्दी झाली होती. यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले.