पुस्तक वाचून कोणी अभिनय शिकत नाही : जयंत सावरकर यांनी मांडले मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 04:32 PM2018-12-15T16:32:52+5:302018-12-15T16:35:49+5:30
ब्ल्यू एंटरटेनमेंट व सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयवतीने चौथा माय ठाणे शॉर्ट फिल्म फेस्टिवल आयोजित करण्यात आला आहे.
ठाणे: पुस्तक वाचून कोणी अभिनय शिकत नाही. काळानुसार आता शॉर्ट फिल्म्सच्या तंत्रज्ञानातही बदल झाला आहे. दुसऱ्यांचे काम बघून आपल्याला शिकता येते. मला काय शिकायला मिळेल याचा मी विचार करतो अशा भावना ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांनी व्यक्त केल्या.
ब्ल्यू एंटरटेनमेंट व सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय आयोजित चौथा माय ठाणे शॉर्ट फिल्म फेस्टीव्हलचे उद्घाटन ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या पी. सावळाराम सभागृहात शनिवारी सकाळी पार पडले. आमच्या काळात आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा असत. त्यात भाग घेता यावा यासाठी मी तीन वेळा महाविद्यालये बदलली. परंतू या भानगडीत मला ना पदवी घेता आली ना काही करता आले. मग मी या क्षेत्रात स्वतंत्र उमेदवारी सुरू केली. आता काळ बदलला आहे, अशा गोष्टींना महाविद्यालयातून प्रोत्साहन दिले जात आहे. फिल्म मेकिंगसारखे वेगवेगळे कोर्सेस महाविद्यालयात सुरू झाले आहे. अशा प्रकारांचे मार्गदर्शन आमच्या काळात असते तर मी आणखीन काही घडलो असतो. मूळात सिनेमा असो की नाटक यात मी पोट भरण्यासाठी काम केले. मी आधी पडद्यामागे काम करीत होतो, मग अपघाताने नट म्हणून उभा राहीलो. नट झाले म्हणून या कार्यक्रमाला मला आमंत्रित करण्यात आले. शॉर्ट फिल्म्सचा अभ्यास करु पाहू इच्छिणाºया तरुणांबरोबर मी दोन वर्षांपुर्वी स्वच्छता अभियानाची शॉर्ट फिल्म केली. तरुण मुलांबरोबर काम करण्याचा अनुभव वेगळा होता. यावरुन त्यांची आणि आमच्या विचारसरणीतला फरक समजला. माझे सौभाग्य की तरुण मंडळींसोबत मला काम करायला मिळत आहे. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मराठे, मानसी प्रधान, महाविद्यालयाचे खजिनदार सतिश सेठ, सचिन मोरे उपस्थित होते. ब्ल्यू एंटरटेनमेंटचे एकनाथ पोवळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.