'कुणाचेही नागरिकत्व धोक्यात आलेले नाही; जेएनयूमध्ये प्रसिद्धीसाठी सेलिब्रिटींची उपस्थिती'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 12:49 AM2020-01-13T00:49:27+5:302020-01-13T06:36:20+5:30
सुनील देवधर : स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेत ‘सीएए’वर व्यक्त केले मत
डोंबिवली : ज्या राज्यात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सीएए) समर्थनार्थ बोलता येत नसेल, तर ते लांच्छनास्पद आहे. सीएए आणि एनआरसी यामुळे अनेकांचे नागरिकत्व जाणार अशी बोंब मारली जात आहे. मात्र, हा कायदा नागरिकत्व देणारा आहे. काढून घेणारा नाही, हे सर्वांनी लक्षात घ्यावे. त्यामुळे मी आधी सीएएबद्दलच बोलणार. भले मला अटक झाली तरीही चालेल, असे आव्हानच त्रिपुरा राज्याचे भाजपचे प्रभारी सुनील देवधर यांनी दिले.
डोंबिवलीमध्ये राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या २३ व्या स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेच्या दत्तनगर येथील शाळेच्या पटांगणात शुभारंभाच्या व्याख्यानात शुक्र वारी ते बोलत होते. भारताचे नागरिकत्व या विषयावर बोलता येत नाही, हे चालणार नाही, असा टोला देवधर यांनी महाविकास आघाडीला लगावला. कम्युनिस्ट हा भारताचा एक नंबरचा शत्रू आहे. त्रिपुरा राज्यात २५ वर्षे राष्टÑगान होऊ दिले नव्हते. तेथे भाजपचे सरकार येताच राज्याच्या अधिवेशनात राष्टÑगान झाले, असेही त्यांनी नमूद केले.
देवधर म्हणाले की इंदिरा गांधी, पंडित नेहरू, मनमोहन सिंग यांनी ‘सीएए’ची वेळोवेळी गरज व्यक्त केली, पण दिले कोणीच नाही. ते मोदी सरकारने दिले आहे. अवॉर्ड वापसीवाले लोक हे अवॉर्ड मॅनेज करणारे होते. त्यांनी पैसे स्वत:कडे ठेवले आणि केवळ कागद पाठवून दिले, अशी टीकाही त्यांनी मोदीविरोधकांवर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भाषणे ऐका. भारतात कोण लोक राहतात, याची नोंद असली तर काय बिघडले? एनआरसी असावे, असे कोणी सांगितले तर ते पंडित नेहरूंनी म्हटले होते. आसाममध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशाने आणण्यात आले. मोदींनी अजून कुठेही एनआरसी मांडलेले नाही.
मात्र, पाकिस्तान, बांगलादेशमधून आलेल्या घुसखोरांना येथे थांबता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ज्यांनी फाळणी मागितली ते आता मुंब्य्रात राहत आहेत. सीएएवर बोलण्यास मनाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी मुंब्य्रात काय चालले आहे, हे जरा पाहावे, असा सल्लाही देवधर यांनी दिला. देवधर यांनी उपस्थित नागरिकांना सीएएला पाठिंबा देण्यासाठी भाजपच्या नंबरवर मिसकॉल देण्याचेही आवाहन केले. यावेळी व्यासपीठावर संस्थाध्यक्ष डॉ. सुभाष वाघमारे, उपाध्यक्ष विलास जोशी, कार्यवाह डॉ. दीपक कुलकर्णी हे उपस्थित होते. स्वागतगीत व ईशस्तवन आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. अरु णोदय माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी करिष्मा संजय काळे हिने म्हटलेल्या ‘वंदे मातरम्’ गीताने कार्यक्र माचा समारोप झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आश्रमशाळेचे मुख्याध्यापक हेमंत चोपडे यांनी केले. तर, आभार अरु ण ऐतवडे यांनी मानले. यावेळी संस्थेचे नरेंद्र दांडेकर, भाई उंटवाले, वसंत देशपांडे, भाजपचे माजी मंत्री जगन्नाथ पाटील, नगरसेवक कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
जेएनयूमध्ये प्रसिद्धीसाठी सेलिब्रिटींची उपस्थिती
जेएनयूमध्ये आठ हजार विद्यार्थी शिकतात. तेथे चार हजार मतदार असून त्यातील दोन हजार मते ही अभाविपला मिळतात. तसेच अन्य हजारो मते ही कम्युनिस्टांना मिळतात. भाजपचे अनेक नेते हे जेएनयूमधून आले आहेत. काही शेकडा विद्यार्थीच गोंधळ घालत आहेत. जेएनयूला विरोध नाही. मात्र, तेथे कलाकार मंडळी हजेरी लावत आहेत, ते केवळ प्रसिद्धीसाठीच, असे देवधर यांनी सांगितले.