फटाक्याच्या दुकानासह ३५० जणांना एनओसी प्रमाणपत्र, उल्हासनगर महापालिकेच्या टार्गेटवर फटाक्यांची दुकाने
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 20:30 IST2021-10-25T20:29:34+5:302021-10-25T20:30:15+5:30
उल्हासनगर महापालिकेने रुग्णालय, लॉजिग-बोर्डिंग, हॉटेल, शैक्षणिक संस्था, हार्डवेअर दुकाने, कपडे दुकाने, गृहसंकुल, मॉल, पेट्रोल पंप, चित्रपटगृह, मोठे वाणिज्य व्यापारी केंद्र आदींना अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र सक्तीचे केले.

फटाक्याच्या दुकानासह ३५० जणांना एनओसी प्रमाणपत्र, उल्हासनगर महापालिकेच्या टार्गेटवर फटाक्यांची दुकाने
सदानंद नाईक -
उल्हासनगर - कॅम्प नं-४ व नेहरू चौक परिसरातील बहुतांश फटाक्याच्या दुकानांसह तब्बल ३५० जणांना अग्निशमन विभागाने एनओसी प्रमाणपत्र देऊन ५ लाखा पेक्षा जास्त दंडात्मक रक्कम वसूल केल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली. दिवाळी सणाच्या पाश्वभूमीवर फटाक्यांचे दुकाने महापालिका व पोलिसांच्या टार्गेटवर असून त्यांनी कारवाईचे संकेत दिले आहेत.
उल्हासनगर महापालिकेने रुग्णालय, लॉजिग-बोर्डिंग, हॉटेल, शैक्षणिक संस्था, हार्डवेअर दुकाने, कपडे दुकाने, गृहसंकुल, मॉल, पेट्रोल पंप, चित्रपटगृह, मोठे वाणिज्य व्यापारी केंद्र आदींना अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र सक्तीचे केले. तसा ठराव यापूर्वीच महापालिकेने मंजूर केला. सुरवातीला ना हरकत प्रमाणपत्रा साठी १ हजार रुपये, तर नंतर नूतनिकरणाचे ५०० रुपये शुल्क ठेवण्यात आले. उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी सुरक्षेतेसाठी अग्निशमन विभागाचे एनओसी प्रमाणपत्र सक्तीचे केले असून त्यापासून महापालिकेला वर्षाला चार कोटी पेक्षा जास्त उत्पन्न अपेक्षित आहे. शहरातील ३० पेक्षा जास्त फटाक्याच्या दुकानांना एनओसी प्रमाणपत्र दिले असून नियमांचा भंग केल्यास दंडात्मक कारवाईचे संकेतही नाईकवाडे यांनी दिले.
शहरातील नेहरू चौक परिसर व कॅम्प नं-४ परिसरात होलसेल फटाक्यांचे दुकाने असून कर्जत, कसारा, बदलापूर, शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, ठाणे, कल्याण, डोंबिवली व ग्रामीण परिसरातील शेकडो दुकानदार फटाक्यांची खरेदी करण्यासाठी उल्हासनगरात येतात. तसेच दुकानदार ऐन दिवाळी सणादरम्यान नियमचा भंग करून उघड्यावर फटाक्यांची विक्री करतात. तसेच त्यांची फटाक्यांची गोदामे रहिवासी क्षेत्रात असल्याने, मोठी दुर्घटना होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. महापालिका प्रशासन व पोलिसांनी, रहिवासी क्षेत्रातील फटाक्यांच्या गोदामाचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, महापालिका अग्निशमन विभागाने ५०० पेक्षा जास्त दुकानांना नोटिसा देऊन ना हरकत प्रमाणपत्र घेण्यास सांगितले.