घर विकताना NOC हवीच, गृहनिर्माण खात्याला अधिकार नाही - सीताराम राणे 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 05:57 AM2022-04-15T05:57:28+5:302022-04-15T05:58:10+5:30

घर विकण्यासाठी सोसायटीच्या अध्यक्ष, सचिवांच्या एनओसीची गरज नाही, असे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी स्पष्ट केले.

NOC required for sale of house housing department has no authority says Sitaram Rane | घर विकताना NOC हवीच, गृहनिर्माण खात्याला अधिकार नाही - सीताराम राणे 

घर विकताना NOC हवीच, गृहनिर्माण खात्याला अधिकार नाही - सीताराम राणे 

googlenewsNext

सुरेश लोखंडे

ठाणे :

घर विकण्यासाठी सोसायटीच्या अध्यक्ष, सचिवांच्या एनओसीची गरज नाही, असे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी स्पष्ट केले. सहकार क्षेत्राच्या कायद्यात व उपविधीमध्ये २०१४ मध्ये ही तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे आव्हाड, यांनी नवीन काहीच सांगितलेले नाही. परंतु सुरक्षेच्या दृष्टीने, सोसायटीची थकबाकी वसूल करण्याकरिता व शेअर सर्टिफिकेटवर नव्या मालकाचे नाव नोंदविण्याकरिता सोसायटीच्या अध्यक्ष, सचिवांची पूर्वपरवानगी घेणे हितकारक आहे. शिवाय गृहनिर्माण खात्याला सहकार क्षेत्रातील तरतुदीचा अधिकारही नाही, असे मत ठाणे जिल्हा हाउसिंग सोसायटीचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. 

गृहनिर्माण सोसायटीमधील रहिवाशांना घर विकण्यासाठी आता सोसायटीचे अध्यक्ष, सचिवांच्या परवानगीची गरज नसल्याचे आव्हाड यांनी बुधवारी जाहीर केले. याबाबत राणे म्हणाले की, सहकार कायद्यात व उपविधीमध्ये ही तरतूद २०१४ पासून आहे. सहकार खात्याच्या आधीच्याच कायद्याविषयी बोलून आव्हाड यांनी गृहनिर्माण विभागाचा निर्णय असल्याचे भासवले. 

सोसायटीमधील घर विक्रीला काढले असता अध्यक्ष, सचिव आणि अन्य पदाधिकारी ते घर आपल्या नातेवाइकास, जवळच्या मित्रास घेता यावे म्हणून घर मालकाला एनओसी देण्यास टाळाटाळ करतात. त्यातून घर मालकाची सुटका करण्यासाठी सहकार कायदा व त्यातील उपविधीमध्ये परवानगी घेण्याची गरज नसल्याची तरतूद केली. घर विकताना व भाड्याने देताना परवानगी घेण्याची तरतूद सुरक्षेच्या दृष्टीने सोसायटी व रहिवाशांच्या हिताची आहे. घर भाड्याने देण्याची पूर्वसूचना पोलिसांना द्यावी लागते. घर विकल्यानंतर शेअर सर्टिफिकेटवर नवीन घरमालकाचे नाव नोंदविण्याचा विषय सोसायटीच्या मिटिंगमध्ये चर्चेला येतो. सोसायटीची थकबाकी भरल्याशिवाय घर विक्रीचा व्यवहार होत नाही. सोसायटीच्या पूर्वपरवानगीमुळे थकबाकी राहात नाही, याकडे राणे यांनी लक्ष वेधले.

जिल्ह्यात ३२ हजार हाउसिंग साेसायट्या! 
जिल्ह्यात ३२ हजार गृहनिर्माण सोसायट्या आहेत. त्यापैकी ठाणे शहरात सहा हजार ५०० सोसायट्यांमध्ये एकूण लोकसंख्येच्या ६० टक्के लोक राहतात. अनेक सोसायट्यांमध्ये काही रहिवासी व सोसायटीचे पदाधिकारी यांच्यात मेंटेनन्सच्या थकबाकीपासून अनेक विषयांवरून वाद असतात. त्यामुळे पदाधिकारी फ्लॅट विकण्याकरिता अथवा भाड्याने देण्याकरिता ना-हरकत प्रमाणपत्र देत नाहीत ही याची एक बाजू आहे; पण त्याचवेळी चुकीच्या व्यक्तीला फ्लॅट विकला किंवा भाडेकरू म्हणून ठेवल्यानंतर काही गुन्हेगारी स्वरूपाची घटना घडल्यावर फ्लॅट मालकाने सोसायटीला विश्वासात घेतले नसल्याचे स्पष्ट होते.

Web Title: NOC required for sale of house housing department has no authority says Sitaram Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.