ओसीसाठी हवी वृक्ष प्राधिकरणाची एनओसी; विकासकांच्या मुसक्या आवळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 12:43 AM2020-01-16T00:43:23+5:302020-01-16T00:43:54+5:30
ठाणे महानगरपालिका प्रशासनाचा निर्णय
ठाणे : ठाणे महापालिका हद्दीतील विकासकांना आता शहर विभागातून ओसी मिळविण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाची नाही, तर वृक्ष प्राधिकरण समितीची एनओसी घ्यावी लागणार आहे. त्या स्वरूपाचा निर्णय मंगळवारी झालेल्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यापूर्वी वृक्ष प्राधिकरण विभागाकडून या एनओसी दिल्या जात होत्या. परंतु, यापुढे आता त्या समितीकडून दिल्या जातील, असे या बैठकीत प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यामुळे वाटेल तशी वृक्षतोड करणाऱ्या विकासकांच्या मनमानीला आळा बसेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
महापालिका हद्दीत विविध प्रकारची मोठी गृहसंकुले उभी राहत आहेत, त्यासाठी अनेक वृक्षांची तोड केली जाते. मात्र, तोडलेल्या वृक्षानंतर त्याठिकाणी किती वृक्षांचे पुनर्रोपण केले आहे, याची नेमकी माहिती वृक्ष प्राधिकरण विभागाकडे उपलब्ध नसते. असे असले तरी या विभागाकडून विकासकाला ओसी मिळण्यासाठी एनओसी दिली जाते. मात्र, काही वर्षांपूर्वी न्यायालयानेदेखील पुण्यातील एका प्रकरणात शहर विकास विभागाने ओसी देण्यापूर्वी वृक्ष प्राधिकरण समितीची एनओसी घेणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले असल्याची माहिती वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य विक्रांत तावडे यांनी दिली.
मागील बैठकीतही त्यांनी हे प्रशासनाच्या निदर्शनास आणले होते. मात्र, त्यावर योग्य असा निर्णय झाला नव्हता. यामुळे मंगळवारी झालेल्या बैठकीत पुन्हा त्यांनी या मुद्याला हात घातला. वास्तविक पाहता विकासकांना वृक्षतोडीची परवानगी दिल्यानंतर, त्यांनी नियमानुसार किती वृक्षांचे पुनर्रोपण केले आहे, याची माहिती घेणे महत्त्वाचे आहे. त्यानुसार, ओसी देण्यापूर्वी ते प्रकरण समितीपुढे यावे, अशी मागणीही त्यांनी केली. कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून त्यानुसार निर्णय घ्यावा, असेही त्यांनी या बैठकीत स्पष्ट केले. यानंतर, प्रशासनानेदेखील यापुढे ओसी देण्यापूर्वी वृक्ष प्राधिकरण समितीची एनओसी घेतली जाईल, असे स्पष्ट केले.
समिती पाहणी करूनच देणार एनओसी
आता या समितीच्या माध्यमातून अशी प्रकरणे एनओसीसाठी आल्यास त्यानुसार संबंधित विकासकाने नियमानुसार वृक्षतोडीच्या बदल्यात वृक्षांचे पुनर्रोपण केले आहे अथवा नाही, याची पाहणी केली जाणार आहे. त्यानुसार, त्याचा अहवाल तयार करून एनओसी द्यायची किंवा नाही, याचा निर्णय घेतला आहे.