दहीहांडी उत्सवात ध्वनी प्रदुषणाचाही कल्ला; आवाजाची मर्यादा ८० डेसीबलच्या पार
By अजित मांडके | Published: August 22, 2022 03:52 PM2022-08-22T15:52:46+5:302022-08-22T15:53:04+5:30
दहीहंडी आयोजकांच्या या मनमानीपणा विरोधात पोलिस प्रशासन काय भूमिका घेते या कडे साऱ्यांचे लक्ष लागलेले असतांना पोलिसांनी एकही गुन्हा दाखल केलेला नाही अशी माहिती ठाणे शहर पोलीस आयुक्तयल्याच्या नियंत्रण कक्षातून देण्यात आली.
अजित मांडके
ठाणे - कोरोनामुळे मागील दोन वर्षे उत्सवावर विरजन पडले होते. परंतु यंदा दहीहांडीचा कल्ला झाला तसाच ध्वनी प्रदुषणाचाही कल्ला झाल्याची माहिती पुढे आली. दहीहांडीच्या दिवशी प्रत्येक महत्वाच्या दहीहांडीच्या ठिकाणी आवाजाची मर्यादा पार झाल्याचे दिसून आले. शहरातील अनेक ठिकाणी या दिवशी आवाजाची पातळी ८० डेसीबलच्या पार गेल्याचे दिसून आले. पोलीस पथकाकडून ही नोंद करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यालयाच्या आदेशाप्रमाणे नागरी वस्तीत साउंड सिस्टीमचा ६५ डेसिबल पेक्षा अधिक आवाज असू नये असे आदेश असतांना ठाण्यातील सर्वच प्रमुख दहीहंडी आयोजकांनी या आदेशाचे शनिवारी उल्लंघन केले. पोलिसांनी दहीहंडी आयोजकांना नियम पाळण्याच्या सक्त पूर्वसूचना दिलेल्या असतांनाही दहीहंडी मंडळांनी पोलिसांना न जुमानता साउंड सिस्टीमचा आवाज वाढवला.
दहीहंडी आयोजकांच्या या मनमानीपणा विरोधात पोलिस प्रशासन काय भूमिका घेते या कडे साऱ्यांचे लक्ष लागलेले असतांना पोलिसांनी एकही गुन्हा दाखल केलेला नाही अशी माहिती ठाणे शहर पोलीस आयुक्तयल्याच्या नियंत्रण कक्षातून देण्यात आली. ठाण्यातील बहुतांशी दहीहंड्या या राजकीय नेत्यांनी आयोजित केलेल्या होत्या. त्यात भाजपच्या स्वामी प्रतिष्ठानने आयोजित केलेली हिरानंदानी मेडोज येथील हंडीहंडीसह, भगवती शाळेच्या मैदानावर आयोजित मनसेची हंडी, आमदार प्रताप सरनाईक यांची संस्कृती प्रतिष्ठानची हंडी, खासदार राजन विचारे यांची जांभळी नाक्यावरील हंडी, रघुनाथ नगर येथील आमदार रवींद्र फाटक यांची हंडी आणि टेम्भीनाका येथील हंडी आदींचा समावेश होतो. या सर्वच प्रमुख दहीहंडी आयोजकांनी उत्सवावेळी ऑर्केस्ट्रा आणि डीजेचा आवाज घुमवला होता. दरम्यान, ऑर्केस्ट्राचा आवाज ६० ते ७० डेसीबल इतका नोंदवण्यात आला तर ज्या ठिकाणी डीजे होता अशा ठिकाणी आवाज ८० ते ८५ डेसीबलच्या घरात होता अशी माहिती सूत्रांनी दिली. तर आवाज मर्यादेचा भंग करणाऱ्या मंडळाविरुद्ध अद्याप एकही एफआयआर दाखल करण्यात आली नसल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षातून देण्यात आली.