काँग्रेसचे नसलेल्या मिशीला तूप; राणे भडकले
By admin | Published: January 29, 2017 03:24 AM2017-01-29T03:24:28+5:302017-01-29T03:24:28+5:30
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीमध्ये वितुष्ट निर्माण करणाऱ्या आठ जागांपैकी पाच जागांवर काँग्रेसकडे तुल्यबळ उमेदवार नसल्याचे स्पष्ट झाल्याने या आघाडीकरिता आग्रही
- पंकज रोडेकर, ठाणे
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीमध्ये वितुष्ट निर्माण करणाऱ्या आठ जागांपैकी पाच जागांवर काँग्रेसकडे तुल्यबळ उमेदवार नसल्याचे स्पष्ट झाल्याने या आघाडीकरिता आग्रही असलेल्या नारायण राणे यांनी ठाण्यातील काँग्रेस नेत्यांची हजेरी घेतल्याचे समजते. नसलेल्या मिशीला तूप लावून फिरणाऱ्या नेत्यांना घरचा आहेर मिळाल्यावर आता काही जागांची अदलाबदल करून आघाडी मार्गी लावण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
ठाण्यात दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली, अशी घोषणा २१ जानेवारी रोजी राणे हे करून बसले असल्याने आता आघाडी करणे, हा राणे यांच्याकरिता प्रतिष्ठेचा मुद्दा झाला आहे. मात्र, ज्या दिवशी राणे यांनी आघाडीची घोषणा केली, त्याच दिवशी झालेल्या बैठकीत आठ जागांवरून ठाण्यातील काँग्रेसचे नेते मनोज शिंदे व राष्ट्रवादीचे नेते आ. जितेंद्र आव्हाड यांच्यात बाचाबाची झाली होती.
काँग्रेसने मुंब्रा, गोकूळनगर, घोडबंदर, बाळकुम, वागळे आदी जागांवर दावा केला होता. तिढा सुटत नसल्याने राणे यांनी ठाण्यात येऊन या आठ जागांकरिता इच्छुकांसोबत चर्चा केली. या सर्व जागांवर एकही तगडा उमेदवार काँग्रेसकडे नसल्याची किंबहुना पाच जागांवर पक्षाकडे उमेदवारच नसल्याची माहिती राणे यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे संतापलेल्या राणे यांनी स्थानिक नेत्यांना चांगलेच फैलावर घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर, आता राष्ट्रवादीने देऊ केलेल्या काही जागांऐवजी काही जागांची अदलाबदल करण्याबाबत वाटाघाटी सुरू झाल्या असून अशा जागांची संख्या सात ते आठच्या आसपास आहे. शुक्रवारी रात्री राष्ट्रवादीच्या कार्यालयात यासंदर्भात बैठक झाली आहे. या बैठकीत तीन ते चार जागांवर तोडगा निघाल्याचा दावा करण्यात येत असून उर्वरित जागांचा फैसला दोन दिवसांत होऊन आघाडीची घोषणा फलद्रुप होईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.