'अहिंसा, शांततामय आंदोलनाचा मार्ग कदापि सोडणार नाही'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 12:28 AM2020-02-27T00:28:47+5:302020-02-27T00:29:01+5:30

भिवंडी, मुंब्य्रातील आंदोलकांची ग्वाही; दंगे घडवल्याची भावना

'Non-violence, peace will never break the path of agitation' | 'अहिंसा, शांततामय आंदोलनाचा मार्ग कदापि सोडणार नाही'

'अहिंसा, शांततामय आंदोलनाचा मार्ग कदापि सोडणार नाही'

Next

- नितीन पंडित/ कुमार बडदे 

भिवंडी/मुंब्रा : तीन दिवसांमध्ये दिल्लीत घडलेल्या घटनांमुळे अस्वस्थता आहे. शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याबाबत हुरहुर आहे. मात्र, येथील आंदोलनातील शांतता ढळू द्यायची नाही आणि कुणी कितीही चिथावणी दिली तरी तोल ढळू द्यायचा नाही, यावर भिवंडीतील मिल्लतनगर आणि मुंब्रा येथील अग्निशमन केंद्रापाशी आंदोलनास बसलेल्या आंदोलकांचा निर्धार पक्का आहे.

मुंब्य्रातील आंदोलनस्थळी दिल्लीतील हिंसाचाराच्या बातम्या पोहोचल्यावर दिल्ली पोलीस तसेच गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात घोषणा देण्यात आल्या असल्या, तरी आंदोलन अहिंसेच्याच मार्गाने सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलक महिलांनी व्यक्त केला. दोन महिन्यांपासून दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागायला नको होते, असे मत आंदोलक महिलांनी व्यक्त केले. दिल्लीतील शाहीनबागच्या धर्तीवर मुंब्रा येथे ३९ दिवसांपासून एनआरसी, सीएए, एनपीआरविरोधात महिलांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनातील प्रमुख वक्त्यांपैकी एक रेहाना शेख म्हणाल्या की, दिल्लीत आंदोलनाला हिंसक वळण लागणार याची कुणकुण लागली होती. दिल्लीतील घटनांमुळे येथील आंदोलक विचलित झाले नसून, या घटना कोणी घडवून आणल्या, याची माहिती सर्वांना आहे, असे शेख म्हणाल्या. क्रि येवर प्रतिक्रि या व्यक्त न करता सत्य आणि अहिंसेच्या मार्गानेच उत्तर देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले. मुंब्रा येथे सर्वधर्मीय नागरिक एकोप्याने राहतात. अनेक कठीण प्रसंगांमध्ये एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहतात. यापुढेही आम्ही सारे असेच एकोप्याने राहू, अशी ग्वाही आंदोलनात काही दिवस सहभागी झालेल्या संगीता पालेकर यांनी दिली.

मुंब्य्रातील कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात असल्याची माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी ‘लोकमत’ला दिली.

संवेदनशील भिवंडी शहरात २७ दिवस सुरू असलेल्या आंदोलनात एकात्मतेची प्रचीती आली व दिल्लीतील घटनांनंतरही ते चित्र बदलणार नाही, अशी ग्वाही आंदोलक व अन्य नागरिकांनी दिली. सीएएच्या विरोधात भिवंडीत अनेक आंदोलने झाली. मात्र, शांततामय वातावरण कायम राहिले.
भिवंडीसारख्या संवेदनशील शहरात हे आंदोलन इतक्या दीर्घकाळ शांततेत सुरू राहण्यामागे पोलिसांचा वाढत जनसंपर्क आणि पोलीस प्रशासनाने केलेले नियोजन हेच कारण असल्याचे दोन्हीकडील लोकांचे म्हणणे आहे. भिवंडीत १९८४ च्या दंगलीनंतर जी शांतता आहे, ती आजपर्यंत कायम आहे.
दिल्लीतील आंदोलनाने हिंसक वळण घेतले असले, तरी भिवंडीत तशी परिस्थिती आम्ही येऊ देणार नाही. जर कुणी भडकावू प्रतिक्रि या देत असेल, तर अशांवर पोलिसांनी थेट कारवाई केली तरी हरकत नाही. शहरातील शांतता, अखंडता अबाधित राहिली पाहिजे, अशी प्रतिक्रि या इम्रानअली सय्यद यांनी दिली.

आंदोलनामुळे सर्व समाजांतील नागरिकांमध्ये सध्या बंधुभावाचे नाते निर्माण झाले आहे. भिवंडीतील सर्व जाती-धर्मांचे लोक एकमेकांचा आदर करीत असून शहरात अखंड शांतता नांदेल, असे मत किरण चन्ने यांनी व्यक्त केले.

Web Title: 'Non-violence, peace will never break the path of agitation'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.