‘मिलीबग’ नव्हे,‘मिलीभगत’ रोग
By Admin | Published: July 7, 2017 06:11 AM2017-07-07T06:11:54+5:302017-07-07T06:11:54+5:30
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ठिकठिकाणी झाडे लावण्यासह सामाजिक वनीकरणाचा संदेश देण्याचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मात्र
अनिकेत घमंडी/लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ठिकठिकाणी झाडे लावण्यासह सामाजिक वनीकरणाचा संदेश देण्याचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मात्र झाडे लावल्यावर त्याचे संगोपन, देखभाल कोणी करायची याची जबाबदारी घेण्यास कोणी पुढाकार घेत नाही. डोंबिवली एमआयडीसी परिसरातील ७ झाडांना ‘मिलीबग’ रोगाची लागण झाल्याने ती सुकून मेल्याची माहिती कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या उद्यान अधीक्षकांनी दिली. पण अभ्यासूंच्या मते केवळ ७ झाडांनाच रोगाची लागण कशी काय झाली, परिसरात अन्य झाडांना या रोगाची लागण का झाली नाही? त्यामुळे हा ‘मिलीबग’ रोग आहे की मिलीभगत रोगामुळे झाडे मारली गेली, अशी शंका घ्यायला पुरेसा वाव आहे.
शहरातील प्रख्यात आर्कीटेक राजीव तायशेटे यांनी तर मिलीभगतमुळेच झाडे मारली जात असल्याचा दावा केला असून महापालिकेचा वृक्ष प्राधिकरण विभाग निद्रावस्थेत असल्याचे म्हटले आहे. मुंबईतील झाडांना लागलेला रोग डोंबिवलीपर्यंत येईपर्यंत हा विभाग काय झोपा काढत होता का?रोग नियंत्रणाकरिता तातडीची उपाययोजना का केली गेली नाही? महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले असताना आता पर्यावरणही धोक्यात आणता का? असे संतापजनक सवाल पर्यावरणप्रेमींनी प्रशासनाला केले असून त्याची समाधानकारक उत्तरे प्रशासनाकडे नाहीत.
गेल्या पाच वर्षात महापालिका क्षेत्रासह अन्यत्र किती झाडे लावली, त्या झाडांचे काय झाले. त्यातील किती झाडे जगली, जी जगली नाहीत ती का जगली नाहीत याची माहिती घेतली का? घेतली असेल तर ती समाजासमोर उघडपणे मांडली का? पर्यावरणाबाबत आपण खरच सजग आहोत का? असे असंख्य सवाल झाडे मेल्यामुळे उपस्थित होत आहेत.
एका ठराविक वस्तीमधील सुमारे २०-२५ वर्षे जुनी सात झाडे कशी काय मरु शकतात, या घटनेनी पर्यावरणप्रेमी अस्वस्थ आहेत. काही ठिकाणी झाडांच्या बुंध्याला कचरा ठेवून आग लावली जाते. त्यामुळे झाडे मरतात. बहुतांशी ठिकाणी जेथे रस्त्यांच्या कडेला झाडे लावली आहेत त्या ठिकाणी जाळ््या लावल्या असल्या तरी त्या जाळ््यांमध्ये परिसरातील व्यापारी कचरा टाकतात. त्यामुळे झाडे जगत नाहीत. हे व असे मार्ग वापरुन झाडे हेतूत: नष्ट केली जातात.
महापालिकेचा वृक्ष प्राधिकरण विभागाने झाडांच्या मृत्यूची त्रयस्थ यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करायला हवी. महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची अनेक महिन्यांपासून बैठकच झालेली नाही. समितीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विशेष उपक्रमही केलेले नाहीत, ही शोकांतिका असल्याची टीका होत आहे. समितीतील काही सदस्यांना जरी पर्यावरणाबद्दल प्रेम वाटत असले तरीही अन्य प्रभावशाली सदस्यांची साथ मिळत नसल्याने आनंदी आनंद आहे.
ठाकुर्लीतील बारा बंगला परिसरातील शेकडो वर्षे जुनी झाडे कापण्यास तत्कालीन स्थानिक नगरसेवक श्रीकर चौधरी यांनी विरोध केला होता. स्वाक्षरी अभियान केले होते. त्यास ठाकुर्लीतील रहिवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत वृक्षतोड थांबवण्यासाठी एकीचे दर्शन घडवले होते. पण त्या आक्रोशाकडे दुर्लक्ष करीत समितीच्या बैठकीत वृक्षतोडीस मंजूरी देण्यात आली. त्यामुळे ठाकुर्ली परिसरातील वृक्षप्रेमींचा हिरमोड झाला. ज्येष्ठ नागरिक आजही एकेकाळच्या ‘हिरव्यागार डोंबिवली’च्या कहाण्या सांगतात.
सिमेंटच्या जंगलामुळे शहराचा झालेला विचका, पर्यावरणाचा ऱ्हास बघवत नसल्याचे दु:ख बोलून दाखवतात. ठाकुर्लीसह एमआयडीसी परिसर, डीएनसी, नांदिवली, बावनचाळ, महाराष्ट्रनगर, खाडीचा परिसर आदी ठिकाणी प्रचंड झाडी होती. संध्याकाळी विशिष्ट वेळेनंतर त्या भागात जाण्यासही कोणी धजावत नसे. आता हा परिसर उजाड झाला आहे. येथील वृक्षसंपदा हळूहळू नष्ट करण्यात आली.
पाठ्यपुस्तकातच दाखवायचे का?
अन्यथा नव्या पिढीला आंबा, फणस, पेरु, चिकू, लिंबु ही झाडे केवळ चित्रातून दाखवावी लागतील.
तसेच विविध रंगी फुले असतात याचीही महिती केवळ पाठ्यपुस्तकातुन द्यावी लागेल. डोंबिवलीत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनीही ‘रोझ गार्डन’ची निर्मिती केली, पण त्या ठिकाणी परप्रांतातून आणलेली गुलाबाची झाडे जगलीच नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त लावलेले ‘मोदी रोझ’ हे झाड देखील मृत झाले.
चव्हाण यांच्यासारखा जाणकार लोकप्रतिनिधी रोझ गार्डनची निर्मिती करताना पर्यावरणविषय अभ्यासाचा आधार घेत नसेल तर महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागातील पोटार्थी अधिकाऱ्यांकडून काय अपेक्षा करायची?
आॅडिटच करा
दरवर्षी किती झाड लावली अन् किती जगली याचे आॅडीट व्हायला हवे. महापालिकेने ते कधी केले आहे का? तसेच वृक्ष लागवडीकरिता किती निधीची तरतूद केली जाते, त्याचा किती उपयोग झाला, त्यातून सकारात्मक काही निष्पन्न झाले का? असे सवाल प्राधिकरणच्या सदस्यांनी वेळोवेळी विचारले, पण त्यांच्या हाती काही लागले नाही. त्यामुळे वृक्षांचे आॅडीट व्हायलाच हवे ही सदस्य व पर्यावरणप्रेमींची मागणी रास्त आहे.
स्थानिक झाडे लावा
पर्यावरणाबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी महापालिकेसह विविध सामाजिक संस्था ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्त झाडे लावतात. पण आपल्या परिसराला अनुसरुन कोणती झाडे लावावीत कोणती लावू नयेत याबाबत अभ्यास केला जात नाही. परिणामी झाडे जगत नाहीत व खर्च वाया जातो. केवळ सोहळा साजरा केल्याचे वांझोटे समाधान प्रशासनाला लाभते. ज्या झाडांना कमी पाणी लागते अशी झाडे खाडीकिनारी लावणे अयोग्य आहे. तसेच ज्या झाडांना जास्त पाणी लागते ती मुरुमाच्या कडेला लावण्याचा काही उपयोग नाही. शहरातील बहुतांशी भागामध्ये विशेषत: पूर्वेला ज्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण झाले आहे त्या ठिकाणी अशीच विचार न करता झाडे लावल्याने ३० टक्के झाडेही जगलेली नाहीत.
किती झाडे जगली?
दुभाजकांमध्ये जी झाडे लावली जातात त्यातील किती टिकली याचा अभ्यासही केला जात नाही. त्यासाठी पर्यावरण प्रेमींची मदत घेतली जात नाही. जरी घेतली जात असेल तर त्यांनी दिलेल्या सल्ल्यांची अंमलबजावणी होत नाही. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी सगळयांनी पुढाकार घ्यावा, असे केवळ कागदावर म्हटले जाते. कल्याण-डोंबिवलीमधील सर्वसामान्य नागरिकांना पर्यावरणाबद्दल प्रेम आहेच, त्यामुळे तर बहुतांशी घरांमध्ये आजही जागा मिळेल तेथे तुळशी, गुलाबाची झाडे लावली जातात. काही तर हौसेने मनीप्लांटचे रोप लावतात. शहरांमधील अभ्यासू आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या पर्यावरणस्नेहींना विविध उपक्रमांमध्ये सामावून घ्यायला हवे.