सेवानिवृत्तीचा लाभ मिळू नये म्हणून ठाण्यातील मुख्याध्यापिकेचे सेवापुस्तकच चोरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 10:52 PM2018-04-01T22:52:02+5:302018-04-01T22:57:11+5:30
ज्योती ठाणेकर या मुख्याध्यापिकेला सेवानिवृत्तीचे लाभ मिळू नयेत म्हणून सेवापुस्तिकेसह इतर महत्त्वाच्या कागदपत्रांची चोरी केल्याप्रकरणी संस्थाध्यक्ष भाऊ किरण ठाणेकरसह चौघांविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ठाणे : मुख्याध्यापिका ज्योती ठाणेकर (५८) यांना सेवानिवृत्तीचे लाभ मिळू नयेत, यासाठी शाळेतील त्यांच्या कपाटातून सेवापुस्तिकेसह इतर महत्त्वाच्या कागदपत्रांची चोरी करणारा संस्थाध्यक्ष असलेला त्यांचा भाऊ किरण ठाणेकर आणि भावजयीसह चौघांविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल झाला. मालमत्तेच्या वादातून भावाने हा राग काढल्याचा आरोप ज्योती यांनी पोलिसांकडे केला.
ठाणे पूर्वेतील कोपरी येथील ठाणेकरवाडीतील हुतात्मा मारुतीकुमार एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयात शाळेच्या स्थापनेपासून म्हणजे १९९० पासून ज्योती ठाणेकर या मुख्याध्यापक म्हणून नोकरीला लागल्या. त्याच संस्थेचे सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले. २८ वर्षांच्या सेवेनंतर त्या ३१ मार्च २०१८ रोजी सेवेतून निवृत्त झाल्या. निवृत्तीनंतर त्यांना निवृत्तीवेतन आणि इतर लाभ मिळण्यासाठी संस्थेकडून सेवापुस्तिका आणि इतर कागदपत्रे ठाण्याच्या शिक्षणाधिकारी कार्यालयात सहा महिन्यांपूर्वीच मिळणे अपेक्षित होते. पण, त्याचकाळात ती २८ जून २०१७ ला सकाळी ११.३० ते दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान शाळेतील त्यांच्याच कपाटातून चोरण्यात आली. बनावट चावीच्या आधारे त्यांचा भाऊ तथा संस्थेचा अध्यक्ष किरण ठाणेकर, दुसरा भाऊ दीपक ठाणेकर, किरण याची पत्नी स्रेहा ठाणेकर आणि सुचिता डबरी यांनी ती चोरल्याचा ज्योती ठाणेकर यांचा आरोप आहे. जून २०१७ पासून त्यांनी याबाबत सतत पाठपुरावा करूनही त्यांना त्यांच्याच भावांनी दाद न दिल्याने अखेर याप्रकरणी त्यांनी निवृत्तीच्याच दिवशी कोपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल झाल्यानंतर हे चौघेही पसार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
‘‘संस्थेचे अध्यक्ष किरण ठाणेकर यांच्याशी माझा मालमत्तेवरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. शाळेच्या एका बैठकीतच त्यांनी हा वाद उकरून काढला होता. याच रागातून त्यांनी सेवानिवृत्तीचा लाभ मिळू नये, म्हणून माझी सेवापुस्तिका आणि इतर कागदपत्रे शाळेतील कपाटातून चोरून नेली.’’
- ज्योती ठाणेकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका, हुतात्मा मारुतीकुमार विद्यालय, कोपरी