‘गुजराती- मराठी वाद नव्हे तर शहा- पैठणकर वैयक्तिक वाद’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 11:26 PM2019-09-17T23:26:20+5:302019-09-17T23:36:38+5:30
नौपाडयात एका क्षुल्लक कारणावरुन शहा आणि पैठणकर या दोन कुटूंबामध्ये झालेला वाद हा त्यांचा वैयक्तिक असून त्याला गुजराथी- मराठीचा रंग दिला जाऊ नये. गुजराथी समाजाचा याच्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याचा दावा ठाणे शहर गुजराथी समाजाच्या वतीने मंगळवारी एका पत्रकार परिषेदतून ठाण्यात करण्यात आला.
ठाणे : नौपाड्याच्या विष्णुनगर भागातील रहिवाशी राहुल पैठणकर आणि विकासक हसमुख शहा या दोन ठाणेकरांमधील वाद हा वैयक्तिक असून त्याला गुजराथी आणि मराठी असा रंग दिला जात आहे. गुजराथी समाजाचा याच्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याचा दावा ठाणे शहर गुजराथी समाजाच्या वतीने सुरेश गडा, प्रकाश नरसाणा आदी पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी केला.
पैठणकर आणि शहा वास्तव्यास असलेल्या विष्णुनगर येथील ‘सुयश’ सोसायटीत इमारतीची लिफ्ट पाचव्या मजल्यावरून सहाव्या मजल्यावर येण्यास विलंब झाल्याने ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी हा वाद उद्भवला होता. याच वादातून पैठणकर यांना शहा पिता पुत्रांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्याचवेळी ‘मराठी - घाटी तुला नौपाड्यात रहायची लायकी नाही’ असे आक्षेपार्ह उद्गारही शहा यांनी काढले होते. याचीच गंभीर दखल घेऊन मनसेच्या अविनाश जाधव यांनी शहा याला जाहीर माफी मागायला भाग पाडले. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात शहाविरुद्ध सोमवारी गुन्हाही दाखल झाला. काँग्रेसनेही या प्रकाराचा निषेध व्यक्त केला. या सर्व पार्श्वभूमीवर मंगळवारी ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहात गुजराथी समाजाच्या वतीने सुरेश गडा, जितू मेहता, दीपक भेदा आणि प्रकाश नरसाणा आदी व्यापारी तसेच गुजराथी बांधवांनी पत्रकार परिषद घेऊन आम्ही हसमुख शहा याच्या समर्थनार्थ किंवा विरोधात नसून हा वाद मराठी गुजराथी या दोन समाजांचा नसल्याचे स्पष्ट केले.
ठाणे शहरात गेली अनेक वर्षे मराठी आणि गुजराथी समाज सलोख्याने आणि एकत्रित वास्तव्याला आहे. वास्तविक, गुजराथी समाज हा कोणत्याही इतर समाजाचा द्वेष किंवा राग करीत नसून सर्वांशी आदराने आणि मित्रत्वाने रहातो आहे. गेल्या आठवड्यात दोन ठाणेकरांमध्ये झालेला मारहाणीचा प्रकार ही त्यांची वैयक्तिक बाब असून समाजाचा याच्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. गेल्या अनेक वर्षांपासून गुजराथी समाज हा ठाणेकर म्हणून ठाण्यात वास्तव्य करीत आहे.
भविष्यात असा कोणाचाही वैयक्तिक प्रकार घडल्यास त्यासाठी गुजराथी समाजाला वेठीस धरू नये. तसेच त्याला राजकीय स्वरुपही देऊ नये, असे आवाहनही यावेळी या पदाधिकाऱ्यांनी केले.
शहाच्या कारने महिलेलाही चिरडले
हसमुख शहा हा यापूर्वीही कासारवडवली येथील अपघात प्रकरणात वादग्रस्त ठरला आहे. १५ मे २०१९ रोजी त्याच्या कारने घोडबंदर रोड येथे तीन रिक्षांना धडक दिली होती. या अपघातामध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या वंदना भगत (४४,रा. पानखंडा गाव) या महिलेला जोरदार धडक बसली होती. त्यात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. तर रिक्षाचालकासह चौघेजण जखमी झाले होते. या प्रकरणातही हसमुख याला त्यावेळी कासारवडवली पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणात तो जामीनावर सुटला आहे.