लोढांच्या फायद्यासाठी कोण काम करतंय हे वेगळ सांगायला नको - खासदार कपिल पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2017 04:58 PM2017-10-08T16:58:59+5:302017-10-08T16:59:23+5:30
माझ्यावर मंगलप्रभात लोढा यांच्या गृहप्रकल्पाला फायदा होईल, असा मेट्रोचा मार्ग निश्चित केल्याचा आरोप केला जातो. उलटपक्षी कल्याणातून शिळफाटामार्गे जाणा-या मेट्रोच्या मार्गात पलावासारखा मोठा प्रकल्प येतो.
डोंबिवली: माझ्यावर मंगलप्रभात लोढा यांच्या गृहप्रकल्पाला फायदा होईल, असा मेट्रोचा मार्ग निश्चित केल्याचा आरोप केला जातो. उलटपक्षी कल्याणातून शिळफाटामार्गे जाणा-या मेट्रोच्या मार्गात पलावासारखा मोठा प्रकल्प येतो. यातूनच लोढांच्या फायद्यासाठी कोण काम करतंय हे स्पष्ट होत असल्याची अशी बोचरी टीका खासदार श्रीकांत शिंदेंचे नाव ने घेता भिवंडी मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील यांनी केली. एवढेच नव्हे तर ते पुढे म्हणाले की, कल्याण -डोंबिवलीत येणा-या मेट्रोचे श्रेय फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच आहे.
कल्याण-डोंबिवली पत्रकार संघाने आयोजित दिलखुलास संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. कल्याणमध्ये शनिवारी हा उपक्रम संपन्न झाला. त्यावेळी खा. शिंदेंना त्यांनी टोला लगावला. आपल्या मतदारसंघात लोढा यांचा प्रकल्प नसल्याचे मी जबाबदारीने सांगतोय असेही पाटील म्हणाले. जर एखादे चांगले काम झाले तर आमच्यामुळे आणि वाईट गोष्ट झाली तर ती भाजपामुळे, हे कसल यांचे राजकारण? असा सवाल करीत सत्ताधारी म्हणून चांगल्याबरोबरच वाईट गोष्टींचीही जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे सांगत त्यांनी शिवसेनेवर टिका केली. याठिकाणी ज्याप्रकारचे राजकारण होते तसे अन्यत्र कुठेही केले जात नाही. शहराच्या विकासकामांमध्ये तरी राजकारण करू नये. त्यामूळे शहर विकासाचे अनेक चांगले प्रकल्प मागे पडल्याची खंत व्यक्त करीत आपण शिवसेनेबरोबर याबाबत कोणत्याही वेळी चचेर्साठी तयार आहोत असं खुले आवाहन पाटील यांनी केले.
त्यांच्या राजकीय प्रवासाबाबत सांगताना ते म्हणाले की ते आज जे आहेत ते त्यांच्या वडिलांमुळे. त्यांनी जे संस्कार केले त्यामूळेच आपण इथपर्यंतच प्रवास करू शकल्याचे ते आवर्जून म्हणाले. पाटील यांनी त्यांची कौटुंबिक जडण घडण, ग्रामपंचायत सदस्य ते खासदार पदापर्यंतचा प्रवास, मतदारसंघातील विकासकामे-नागरी प्रश्न, समस्या, नको तितक्या राजकारणामूळे ठाणे जिल्ह्याची झालेली पीछेहाट, भविष्यातील राजकीय प्रवास आदी महत्वाच्या विषयांवर मनमोकळेपणे मतं व्यक्त केली.