ठाण्यातील २५२ झोपडपट्ट्यांना वालीच नाही!

By Admin | Published: January 9, 2016 02:11 AM2016-01-09T02:11:43+5:302016-01-09T02:11:43+5:30

मुंबईत धारावीच्या पुनर्विकासासाठी प्राधिकरणाने जागतिक निविदा काढण्याचा निर्णय घेतल्याने तेथील पुनर्विकासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे

Not only 252 slums in Thane! | ठाण्यातील २५२ झोपडपट्ट्यांना वालीच नाही!

ठाण्यातील २५२ झोपडपट्ट्यांना वालीच नाही!

googlenewsNext

अजित मांडके,  ठाणे
मुंबईत धारावीच्या पुनर्विकासासाठी प्राधिकरणाने जागतिक निविदा काढण्याचा निर्णय घेतल्याने तेथील पुनर्विकासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. परंतु, ठाणे शहरात असे एकही नियोजन प्राधिकरण नसल्याने ठाणे शहरातील २५२ झोपडपट्ट्यांचा विकास रखडला आहे. त्यासाठी अनेक योजना राबविल्या गेल्या. परंतु, त्या अपुऱ्याच ठरल्या. शहरात एसआरडी, म्हाडा आणि आता एसआरए, एमएमआरडीए अशा विविध प्लॅनिंंग अ‍ॅथॉरिटी असल्याने शहरातील झोपडपट्टीचा विकास नेमका कोणत्या माध्यमातून करायचा, यावर अद्यापही तोडगा निघू न शकल्याने पुनर्विकास रखडला आहे.
एका बाजूला डोंगर, वन विभाग, एमआयडीसी, खाडीकिनारा यांची सोबत घेत ठाणे शहर उभे आहे. शहराचा परिसर १२६.२३ चौरस किलोमीटर असून यात ६२ चौरस किमीचा हरित पट्टा आहे. ठाणे पालिकेने झोपडपट्टीमुक्त ठाण्याचे स्वप्न उराशी बाळगले असून शहराचा विकास करताना वाल्मीकी विकास एकात्मिक गृहनिर्माण प्रकल्प योजना (वॅम्बे), शहरी गरिबांकरिता मूलभूत सुविधा पुरविणे (बीएसयूपी), झोपडपट्टी पुनर्विकास योजना (एसआरडी), राजीव आवास योजना (आरएवाय), डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजना, सार्वजनिक-खाजगी सहभाग, बांधकाम हक्क हस्तांतरण, संक्रमण निवारे, रात्रनिवारे, परवडणारी घरे आणि एसआरए असे पर्याय उपलब्ध आहेत.
मुंबई, पुणे, नागपूर ही शहरेवगळता अन्यत्र झोपड्यांच्या विकासासाठी झोपु योजनेपलीकडचे नेमके कोणते पर्याय राबविता येऊ शकतात, याचा अभ्यास दोन वर्षे सुरू आहे, पण त्यातून फारसे काही हाती लागलेले नाही.
आजघडीला ठाणे शहराची लोकसंख्या २० लाखांच्या घरात गेली आहे. शहरातील ५३ टक्के जनता आजही झोपडपट्टीत राहते. लोकसंख्या वाढीचा दर पाहता २०३१ मध्ये हीच लोकसंख्या ३४ लाखांच्या घरात जाईल. हा विचार करून पालिकेने प्रकल्प अहवाल तयार केला आहे. त्यात सध्याची लोकसंख्या १८ लाख ४१ हजार गृहीत धरण्यात आली असून यातील नऊ लाख ८३ हजार जनता झोपडपट्टीत राहते. त्यात दोन लाख ४५ हजार ७०९ कुटुंबांचे वास्तव्य आहे. शहरातील २५२ झोपडपट्ट्यांचा विकास मधल्या काळात एसआरएच्या माध्यमातून करण्याचे निश्चित झाले होते. त्यानुसार, शहराला दोन लाख ३० हजार घरांची गरज आहे. यासाठी तब्बल २१ हजार ९२० कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. परंतु, गेल्या वर्षभरात या योजनेचे एकही पाऊल पुढे पडू शकलेले नाही.
विविध योजनेतून दिलेली घरे...
आतापर्यंत पालिकेने बॉम्बे या योजनेतून १,२४० पैकी ३२० घरे बांधली आहेत. तसेच एसआरडी योजनेतून १७,४९२ पैकी तीन हजार, पीपीपी माध्यमातून ३३८, डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेतून २७४, बांधकाम हस्तांतरण ६१६, संक्रमण निवारे १५,०२० पैकी १,४४८, रात्रनिवारे ७५, परवडणारी ३,४२० घरे बांधली आहेत. बीएसयूपीच्या ६,५४९ घरांपैकी ३,४२३ घरे बाधंण्यात आली असून ३,१२६ घरांची कामे प्रगतीपथावर आहेत. ही योजना आता बंद झाली आहे. एकूणच वेगवेगळ्या एजन्सीच्या माध्यमातून झोपड्यांचा विकास फसल्याने रहिवाशी हताश आहेत.

Web Title: Not only 252 slums in Thane!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.