कल्याणच नव्हे तर ठाणे लोकसभा मतदारसंघही भाजपचाच; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2023 07:34 PM2023-06-11T19:34:51+5:302023-06-11T19:36:21+5:30

ठाण्यातील कार्यकर्ता मेळाव्यात भाजपच्या नेत्यांची भूमिका: कार्यकर्त्यांचाही प्रतिसाद

Not only Kalyan but also Thane Lok Sabha constituency of BJP - girish Mahajan | कल्याणच नव्हे तर ठाणे लोकसभा मतदारसंघही भाजपचाच; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धक्का

कल्याणच नव्हे तर ठाणे लोकसभा मतदारसंघही भाजपचाच; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धक्का

googlenewsNext

जितेंद्र कालेकर 

ठाणे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरुन एकीकडे शिवसेनेच्या शिंदे गटात आणि भाजपामध्ये सुंदोपसुंदी सुरु असतांनाच ठाण्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्यात आक्रमक भूमिका घेत कल्याणच नव्हे तर ठाणेही भाजपचेच असल्याचा दावा भाजपच्या नेत्यांनी रविवारी केला. त्याला भाजपच्या कार्यकर्त्यांनीही जोरदार घोषणाबाजी करीत चांगला प्रतिसाद दिला. 

ठाण्यातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघातील भाजपा पदाधिकाकार्यांबरोबरच बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख हे मोठया संख्येने यावेळी उपस्थित होते. या मेळाव्याला मार्गदर्शन करतांना महाजन बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वच क्षेत्रात अनेक कामे केली. प्रत्येक योजना ही समाजाच्या तळागाळातील कुटुंबांसाठी आहे. प्रत्येक कुटुंबाच्या विकासाबरोबरच नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगतीही वेगाने होत आहे. भारताच्या प्रगतीचे अरब राष्ट्रांकडूनही कौतुक होत आहे. तर पाकिस्तानातील सामान्य जनतेला मोदींच्या कार्याविषयी उत्सूकता आहे, असे महाजन यांनी नमूद केले. केंद्र व राज्य सरकारच्या अनेक सेवाभावी योजना प्रत्येक कार्यकर्त्यांने समाजापर्यंत पोहचविण्याचे आवाहनही त्यांनी केले. 

कल्याणच्या जागेसाठी दावा करणाऱ्या भाजपने ठाणे आणि कल्याण हे दोन्ही लोकसभा मतदार संघ हे पूर्वी भाजपचेच होते, ते यापुढेही राहतील, असा दावा आमदार संजय केळकर यांनी केला. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आम्ही काम करीत आहोत, असा आव काही जण आणत आहेत. अशा फुकटच्या वलग्ना करण्याऐवजी पंतप्रधान मोदी यांनी आणलेल्या योजना तर राबवा, असा टोला केळकर यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव न घेता लगावला. भारतीय जनता पक्षाशिवाय या जिल्ह्यांमध्ये कोणीही निवडून जाऊ शकणार नाही, असा दावाही त्यांनी केला.

दरम्यान, श्री रामजन्मभूमी मंदिर, ३७० कलम हटाव आदींसारखे भाजपच्या कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्षे पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले आहे. आता सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणावर भाजप कार्यकर्त्यांनी भर द्यावा, असे आवाहन राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी केले. नरेंद्र मोदी सरकारने गेल्या नऊ वर्षात राबविलेल्या विविध योजना प्रचार करण्याच्या उद्देशातून भाजपने रविवारी ठाणे लोकसभा मतदार संघातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाटयगृहात मेळाव्याचे आयोजन केले होते. 

बूथची ओनरशिप घ्यावी
ठाणे लोकसभा मतदारसंघात २३०० बूथ आहेत. आगामी निवडणुकीत प्रत्येक बूथवर ५१ टक्के मते मिळविण्याचे लक्ष्य ठेवून भाजपाच्या कार्यकर्त्यांनी एका बूथची ओनरशिप घ्यावी. पक्षाच्या दृष्टीने आगामी काळ हा सचोटीचा असून, भाजपाची ताकद देशाला दाखवून द्यायची आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी बूथवरील लढाई लढावी, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले.

देशात नऊ वर्षांत मोठ्या प्रमाणावर परिवर्तन झाले. मोदी सरकारमुळेच प्रत्येक कुटुंबाच्या जीवनात बदल घडले आहेत, असे मत कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केले. देशातील विषमता दूर होऊन समानतेकडे वाटचाल सुरू झाली असल्याचे आमदार गणेश नाईक यांनी नमूद केले. तर २०२४- मोदी की बडी जीत या घोषणेसह कार्यकर्त्यांनी कार्य करावे, असे आवाहन माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी केले.

Web Title: Not only Kalyan but also Thane Lok Sabha constituency of BJP - girish Mahajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.