केवळ कल्याणच नव्हे, तर ठाणेही आमचेच; मेळाव्यात भाजप नेत्यांची भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2023 10:54 AM2023-06-12T10:54:51+5:302023-06-12T10:55:05+5:30
मोदी सरकारच्या योजनांचा प्रचार करण्यासाठी ठाण्यात मेळावा झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र विद्यमान खासदार यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून शिवसेनेच्या शिंदे गटात आणि भाजपमध्ये कुरघोडी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्यात रविवारी आक्रमक भूमिका घेत कल्याणच नव्हे तर ठाणेही भाजपचेच आहे, असा दावा भाजपच्या नेत्यांनी केला.
यावेळी श्री रामजन्मभूमी मंदिर, ३७० कलम हटवण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. आता सेवा, सुशासन व गरीब कल्याणावर कार्यकर्त्यांनी भर द्यावा, असे आवाहन राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी केले. माेदी सरकारने नऊ वर्षांत राबविलेल्या योजनांचा प्रचार करण्याच्या उद्देशाने भाजपने रविवारी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात मेळावा घेतला. यावेळी महाजन बोलत होते. दरम्यान, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांनी प्रास्ताविक केले. कौशल्यविकासमंत्री मंगलप्रभात लोढा, आ. गणेश नाईक, मंदा म्हात्रे, गीता जैन, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक आणि माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.
भाजपच्या मदतीनेच निवडून याल
नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी काम करीत आहोत, असा आव काही जण आणत आहेत. अशा वल्गना करण्याऐवजी त्यांच्या योजना राबवा, असा टोला आ. संजय केळकर यांनी खा. श्रीकांत शिंदे यांचे नाव न घेता लगावला. भाजपशिवाय या जिल्ह्यात कोणीही निवडून येऊ शकणार नाही, असा दावाही केळकर यांनी केला.