स्मार्ट नव्हे ही तर नकली सिटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 11:19 PM2019-06-19T23:19:58+5:302019-06-19T23:20:09+5:30
स्मार्ट ठाणे आजही कागदावरच; सहा महिन्यांत रिक्त पदांची भरती
ठाणे : एकीकडे ठाणे महापालिका स्मार्ट सिटी, डीजी ठाण्याचा गाजावाजा करत असताना दुसरीकडे अनेक विभागांचा कारभार हा संगणकाविनाच सुरू असल्याची गंभीर बाब बुधवारी झालेल्या महासभेत उघड झाली. त्यामुळे ही स्मार्ट सिटी, डीजी ठाणे नसून हे नकली ठाणे असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते हणमंत जगदाळे यांनी लगावला. महापालिकेत येत्या काळात किती पदे रिक्त होणार, असा प्रश्न शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक नरेश मणेरा यांनी प्रश्नोत्तरांच्या तासात उपस्थित केला. यावेळी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी वेळकाढू उत्तर देऊन संगणकात सर्व डाटा फिड आहे. परंतु, तो कागदावरच द्यावा लागेल आणि त्यासाठी वेळ लागणार असल्याचे सांगितले. त्यामुळे प्रशासनाच्या या उत्तराने नगरसेवक संतप्त झाले.
महापालिकेत अधिकारी आणि कर्मचारी अशी मिळून दोन हजार ५१३ पदे रिक्त असल्याची माहिती प्रशासनाने दिली. येत्या काळात आणखी १४७ पदे रिक्त होणार आहेत. परंतु, ती नेमकी पदे कोणती, असा प्रतिसवाल मणेरा यांनी केला. त्याचे उत्तर आपल्याकडे नसून मी माहिती घेऊन ते देते, असे कार्मिक अधिकारी वर्षा दीक्षित यांनी स्पष्ट केले. परंतु, त्याची माहिती तत्काळ देण्याची मागणी सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी केली.
अनेक अधिकाऱ्यांवर अतिरिक्त भार : अनेक अधिकाºयांवर पाच ते सहा विभागांची अतिरिक्त जबाबदारी आहे. सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी अतिरिक्त कार्यभार एखाद्या अधिकाºयाकडे देता येत नाही. परंतु, नियम पाळले जात नसल्याचा टोला नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी लगावला. स्मार्ट ठाणे, डीजी ठाणे हे सर्व नकली ठाणे असल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या ६२ अधिकाºयांवर अतिरिक्त कार्यभार आहे, अशी माहिती देण्यात आली. जी रिक्त पदे आहेत, ती केव्हा भरणार, असा प्रश्न मणेरा यांनी केला असता सहा महिन्यांत टप्प्याटप्प्याने भरली जातील, असे प्रभारी आयुक्त उन्हाळे म्हणाले.