ट्रॅफिक वॉर्डनचे थकवले चार महिन्यांचे मानधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2023 12:24 PM2023-05-25T12:24:56+5:302023-05-25T12:25:12+5:30
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, यासाठी वाहतूक पोलिसांना मदतनीस म्हणून २० वॉर्डनची नेमणूक अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने करण्यात आली आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
अंबरनाथ : शहरातील वाहतूक नियंत्रणासाठी वाहतूक पोलिसांसोबत मदतनीस म्हणून अंबरनाथमध्ये ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती करण्यात आली आहे. चार महिन्यांपासून या ट्रॅफिक वॉर्डनना अंबरनाथ नगरपालिकेने त्यांचे मानधन दिले नसल्याने ट्रॅफिक वॉर्डन मेटाकुटीला आले आहेत.
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, यासाठी वाहतूक पोलिसांना मदतनीस म्हणून २० वॉर्डनची नेमणूक अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. चार महिन्यांपासून या वॉर्डनला त्यांचे आठ हजार रुपयांचे मानधन न मिळाल्याने त्यांची अवस्था केविलवाणी झाली आहे. आमचे हक्काचे मानधन वेळेत द्यावे, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
अंबरनाथ शहरातील वाहतूक विभागाकडे अपुरे मनुष्यबळ असल्याने शहरातील वाहतूककोंडी सोडवण्यात वाहतूक विभागाची दमछाक होते. त्यासाठी वाहतूक विभागाच्या मदतीसाठी अंबरनाथ नगरपालिकेच्या माध्यमातून आठ हजार रुपयांच्या मानधनावर २० वॉर्डनची नेमणूक केली आहे.
लवकरच पगार हाेईल
पगार लांबल्याबाबत अंबरनाथ नगरपालिकेतील लेखा विभागात माहिती घेतली असता काही तांत्रिक अडचणींमुळे ट्रॅफिक वॉर्डनचा पगार होऊ शकला नाही. लवकरच त्यांचा पगार त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येईल, असे सांगण्यात आले.