तुंबलेले नाले पाचवीलाच पुजलेले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 01:27 AM2020-07-08T01:27:28+5:302020-07-08T01:28:22+5:30
कोरोनामुळे विकासकामे रखडणार अशी शक्यता वर्तवली जात होती. पण राज्य सरकारने पावसाळ््यापूर्वीच्या कामांना मंजुरी दिल्यानंतर शहरांतील नालेसफाईच्या कामांना सुरुवात झाली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बरेच परप्रांतीय कामगार गावाला गेल्याने त्यांचीही अडचण जाणवली.
कोरोनामुळे विकासकामे रखडणार अशी शक्यता वर्तवली जात होती. पण राज्य सरकारने पावसाळ््यापूर्वीच्या कामांना मंजुरी दिल्यानंतर शहरांतील नालेसफाईच्या कामांना सुरुवात झाली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बरेच परप्रांतीय कामगार गावाला गेल्याने त्यांचीही अडचण जाणवली. पालिकांनी नेहमीप्रमाणे नालेसफाईनंतर पाणी तुंबणार नाही असे पठडीतील उत्तर दिले. पण ते आता नुकत्याचा झालेल्या पावसाने खोटे ठरवले. शहरांतील नालेसफाई झाली का याचा आढावा घेतला आहे ‘लोकमत’चे प्रतिनिधी अजित मांडके, मुरलीधर भवार, अनिकेत घमंडी, पंकज पाटील, सदानंद नाईक, धीरज परब यांनी.
ठाण्यात आॅक्टोबरपर्यंत सुरू राहणार सफाई
ठाणे : शहरात पावसाने अधूनमधून का होईना सुरुवात केली आहे. परंतु दमदार सुरु वात झाल्याने शहरातील नाल्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ठाणे महापालिकेच्या वतीने शहरातील नालेसफाई १०० टक्के पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला. परंतु शहरातील नाल्यांची सफाई म्हणावी तशी पूर्ण झालेली नाही हे वास्तव आहे. पावसामुळे आणि नागरिकांनी पुन्हा नाल्यात घाण टाकण्यास सुरुवात केल्याने पुन्हा नाले तुंबण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी नाल्यांची सफाई पूर्ण झालेली असते. यंदा मात्र लॉकडाऊनमुळे नालेसफाईच्या कामाला आधीच उशीर झाला आहे. त्यात मजुरांची संख्याही कमी असल्याने प्रशासनाच्या अडचणी अधिक वाढल्या आहेत. त्यामुळे आजही शहराच्या विविध भागात नालेसफाईची कामे सुरू असल्याचेच चित्र दिसत आहे. आयुक्तांनी केलेल्या पाहणीत किसनगर भटवाडी भागातील नाल्यात घाण असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे या नाल्याची सफाई करण्याचे आदेश त्यांनी दिले होते.
ठाण्यामध्ये १३२ किलोमीटर लांबीचे १३ मोठे आणि ३० छोटे नाले आहेत. नाल्यांच्या साफसफाईचे कोट्यवधींचे कंत्राट कंपन्यांना दिले जाते.
महापालिकेतर्फे३१ मे ही तारीख नालेसफाईची कामे पूर्ण करण्यासाठी दिली होती. मात्र जून महिना संपला तरीही नालेसफाई शिल्लक आहे. एकीकडे पालिका १०० टक्के सफाईचा दावा करत असली, तरी सफाई ७० ते ८० टक्केच पूर्ण झाल्याचे चित्र दिसत आहे.
यापूर्वी पावसाळ््यात नाले तुंबून माणसे वाहून गेल्याच्या दुर्दैवी घटना शहरात घडल्या आहेत. नाल्याबाहेरील कचराही उचलण्यात आल्याचा दावा पालिकेने केला आहे.
नालेसफाईचे काम १०० टक्के पूर्ण झाले असून अजूनही कामे सुरु आहेत. संबंधित कंत्राटदाराची आॅक्टोबरपर्यंत या संपूर्ण कामाची जबाबदारी आहे. त्यानंतरच त्यांना बिल दिले जाणार आहे. बाजूला काढलेला गाळ उचलण्यात आला आहे. परंतु मध्यंतरी झालेल्या पावसाने आणि नागरिक पुन्हा नाल्यात कचरा टाकत असल्याने नाल्यात घाण दिसत आहे. ते साफ होतील.
- अशोक बुरपुल्ले,
उपायुक्त, ठा.म.पा
केडीएमसीबाबत साशंकता
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत लॉकडाऊन असला तरी पावसाळ््यापूर्वीच्या अत्यावश्यक कामांना प्रशासनाने मंजुरी दिली आहे. महापालिका हद्दीतील नालेसफाईला जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात झाली होती. नालेसफाई ९० टक्के झाली असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला तरी लहान नाल्यांची सफाई झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे महापालिकेचा दावा कितपत खरा या विषयी साशंकता व्यक्त केली जात आहे.
शहरातील लहान मोठ्या आकाराचे ९६ नालेसफाईचे कंत्राट महापालिकेने दिले आहे. यंदाच्यावर्षी नालेसफाईच्या कामाच्या खर्चाला कात्री लागली आहे. कोरोनामुळे ही कात्री लावल्याचे सांगण्यात येत आहे. मोठ्या आकाराच्या नाले सफाईसाठी जेसीबी, पोकलन आणले जातात. नालेसफाईच्या कामाची आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांनी पाहणी केली आहे. सफाई केली नसल्यास कंत्रटदाराला बिल दिले जाणार नाही. कार्यकारी अभियंता बबन बरफ यांनी नालेसफाईचे काम ९० टक्के पूर्ण झाल्याचा दावा केला आहे. पाऊस पडल्याशिवाय नालेसफाई खरोखरच झाली आहे का हे कळणार नाही.
डोंबिवलीमध्ये पोलखोल होणे बाकी
डोंबिवली : शहरात कोपर, महाराष्ट्र नगर, म्हात्रे नगर, मानपाडा, घनश्याम गुप्ते पथ, सोनारपाडा, म्हसोबा चौक, सुयोग हॉटेल, चोळे गाव, पाथर्ली आदी भागात मोठे नाले आहेत. या नाल्यांमधून पावसाच्या पाण्याचा निचरा होतो आणि ते पाणी खाडीला मिळते. दरवर्षी नालेसफाईचे दावे पहिल्याच पावसात फोल ठरतात. पण यंदा नालेसफाईची वास्तवता समोर आणणारा पाऊस न पडल्याने महापालिका प्रशासन एका अर्थाने निश्चित समाधानी असल्याचे निदर्शनास येत आहे. मोठे नाले वगळता अन्यत्र कुठेही नालेसफाई ही योग्य रितीने झालेली नाही.
शहरात छोटे उपनाले, गटार मोठ्या प्रमाणात आहेत. महापालिकेने जरी नाले, गटार सफाईचा दावा केला असला तरीही पावसाच्या तुरळक सरींनी रस्त्यावरच्या पाण्याचा वेळीच निचरा होत नाही हे दिसून आले. इंदिरा गांधी चौकाजवळ मानपाड्याला जाताना जेथे वाहने वळण घेतात त्या ठिकाणी पाणी साचते.
नांदिवलीमध्ये श्री स्वामी समर्थ नगरात पाणी तुंबण्याची समस्या कायम असल्याने यंदा आमदार राजू पाटील यांनी नुकतीच या भागाची पाहणी केली. त्यावेळी नाल्यामध्ये बेकायदा बांधकाम झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी आक्षेप घेताच ते काम रातोरात तोडण्यात आले. परंतु नाल्यात बेकायदा काम कोणी केले होते, त्याचे पुढे काय झाले? संबंधितावर महापालिकेने काय कारवाई केली, करणार आहे हे सगळे प्रश्न अनुत्तरीतच असल्याने यंदाही नाल्यात पावसाचे पाणी साचून नाला तुंबणार. अशातूनच नागरिकांना मार्ग काढावा लागणार आहे. प्लास्टिक बंदी असतानाही शहरभर बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांमधून वस्तू मिळत असल्याने त्या पिशव्या ठिकठिकाणी गटारात, नाल्यात आढळून येत आहेत.
महापालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कोपर पश्चिम येथील एका मोठ्या नाल्यात ३ फुटांचा कचरा, त्या खाली नाल्याचे पाणी असा एवढा मोठा कचºयाचा थर साचलेला होता. जेसीबी, ट्रक लावून तो कचरा साफ करावा लागला, पण आता त्या भागातील नाल्यात घाण साचलेली असल्याचे निदर्शनास येत आहे. जूनमध्ये पडलेल्या पावसामुळे अनेक भागात पाणी साचले होते.
नालेसफाई चांगल्या पद्धतीने करण्यासाठी शहरातील विविध भागांतील नगरसेवकांनी महापालिका अधिकाऱ्यांना सांगितले होते. कामगार येऊन काम करत होते, पण अधिकारी दिसले नाही अशी प्रतिक्रि या नगरसेवकांनी दिली. त्यामुळे महापालिकेने कंत्राटदारांवर विश्वास ठेवून नालेसफाई केली असेल तर मात्र त्याची सखोल पाहणी पाऊस पडण्याआधीच व्हायला हवी अशी मागणी नगरसेवक मुकुंद पेडणेकर यांनी केली. ते म्हणाले की, संयुक्त पाहणी करताना सहकारनगरमधून पाहणी सुरू केल्यास नालेसफाईत किती तथ्य आहे हे दिसून येईल.
खंबालपाडा येथे नालेसफाई १०० टक्के पूर्ण झाली नसून अर्धवट झाली असल्याचे तेथील रहिवासी, भाजपचे मंडळ उपाध्यक्ष राजू शेख यांनी सांगितले. तसेच पश्चिमेला घनश्याम गुप्ते रस्त्याखालील नाल्याची सफाई झाली नसल्याचे काँग्रेस नगरसेवक नंदू म्हात्रे म्हणाले. पाथर्ली भागात छोटे गटार, नाला आदींची स्वच्छता झाल्याचे नगरसेवक निलेश म्हात्रे म्हणाले.
भ्रष्टाचारात रुतलेली नालेसफाई
मीरा रोड : मीरा- भार्इंदर महापालिकेची नालेसफाई दरवर्षीच भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये रुतलेली असते. यंदाही नालेसफाईच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप व तक्रारी झाल्या. नालेसफाई मात्र धड झाली नसल्याचे उघड असले तरी पालिका मात्र नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा नेहमीप्रमाणे करत आली आहे. यंदा मीरा- भार्इंदर महापालिकेने नालेसफाईच्या कामाचे कंत्राट बोरिवलीच्या एम.बी. ब्रदर्स या कंत्राटदारास दिले होते. पण पडद्यामागे नेहमीचाच कंत्राटदार कार्यरत होता. पालिकेचे स्वच्छता निरीक्षकही नालेसफाईच्या कामासाठी मजूर आणणे व साहित्य देण्याचे काम करत असल्याचा तक्रारीही झाल्या. दरवर्षी नालेसफाईच्या कामा साठी लावले जाणारे मजुर यांना कमी पैसे देण्यासह आवश्यक सुरक्षा साहित्य न देणे याच्या तक्रारी असतात. या कामासाठी ४०० ते ५०० मजूर लावले जातात असे सांगितले जाते. १ हजार १८२ रुपये इतकी मजुरांची मजुरी निश्चित असताना मजुरांना विचारणा केली असता त्यांना ४०० रुपयापेक्षा वा त्यापेक्षा कमी मोबदला दिला जातो असे समोर आले आहे. पालिका मजुरांच्या बायोमेट्रिक ओळख व हजेरीसह त्यांच्या खात्यात थेट पैसे टाकण्यास टाळटाळ करत आली आहे. जर स्वच्छता होत असेल तर पाणी तुंबते कसे हा प्रश्न आहे.
बंदिस्त नाले साफ करणे खर्चीक
बहुतेक ठिकाणी नाल्यातील गाळ काढून किनाºयावरच ठेवला जातो. पाऊस आला की तो कचरा परत पाण्यात जातो. नालेसफाई तशी काटेकोर होतच नाही. बंदिस्त नाले साफ करणे तर अतिशय खर्चिक व त्रासदायक झाले आहे. झाकणे उचलण्यासाठी महागडी यंत्रे वापरली जातात पण नाल्यांची सफाई काही होतच नाही . पहिला पाऊस पडला की हेच नाले, खाड्या कचºयाने भरतात.
पाणी शिरण्याची भीती
उल्हासनगर : महापालिकेने १०० टक्के नालेसफाई केल्याचा दावा तुंबलेल्या नाल्यांनी फोल ठरवला आहे. मोठ्यांसह लहान नाले अद्याप तुंबले असून कोट्यवधींचा खर्च पाण्यात गेल्याची टीका होत आहे.